बालाजी अमाईन्सकडून स्व. लक्ष्मण गावसाने यांच्या कुटुंबाला मदतीचा हात
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी, वैराग : सततचा पाऊस, बेरोजगारी आणि वाढता आर्थिक भार यामुळे मौजे दहिटणे (ता. बार्शी) येथील शेतकरी लक्ष्मण गावसाने यांनी दिनांक २४ सप्टेंबर रोजी विवंचनेतून आत्महत्या केली. हाताला काम नसल्याने कुटुंबाची जबाबदारी पेलण्यास अपयश येत असल्याच्या मानसिक तणावामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती मिळते.
घटनेनंतर गावसाने कुटुंबाला शासनाकडून मदत मिळवून देण्यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी प्रयत्न केले. तथापि, शासनाच्या मदत निकषांमुळे थेट आर्थिक सहाय्य देण्यास अडचणी येत असल्याने त्यांनी ही परिस्थिती बालाजी अमाईन्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक डी. राम रेड्डी यांना सांगितले आणि कंपनीतर्फे सहाय्य करण्याची विनंती केली.
त्या अनुषंगाने, बालाजी अमाईन्स लिमिटेडने गावसाने कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी पिठाची गिरणी उपलब्ध करून दिली आहे. तसेच त्यांच्या दोन्ही मुलांच्या पदवीपर्यंतच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी कंपनीतर्फे स्वीकारण्यात आली आहे.
ही मदत दिनांक २९ नोव्हेंबर रोजी दहिटणे येथे सहाय्यक महसूल अधिकारी विरेश कडगंची यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. यावेळी मंडल अधिकारी शरद शिंदे, निवृत्ती लांडगे, तलाठी अरविंद कादे, तसेच बालाजी अमाईन्सचे प्रतिनिधी अमोल गुंड उपस्थित होते.




