राज्य उत्पादन शुल्क नागपुर विभागाचीबनावट दारू निर्मिती अवैध कारखान्यावर धडक कारवाई
एकूण 11,93,082/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त
B1न्यूज मराठी नेटवर्क
नागपूर : हुडकेश्वर पोलीस स्टेशन अंतर्गत बेसा येथील रो-हाऊस, प्लॉट नं. 38 क्रिष्णा रॉयल, न्यू हनुमान नगर येथे राज्य उत्पादन शुल्क नागपूर विभागाने बनावट देशी-विदेशी दारु निर्मितीच्या अवैध कारखान्यावर छापा टाकून धडक कारवाई केली. या ठिकाणी छाप्यामध्ये बनावट देशी / विदेशी दारुचा कारखान्यासह मुद्देमाल जप्त करण्यात आला.
राज्य उत्पादन शुल्क आयुक्त राजेश देशमुख, सहआयुक्त प्रसाद सुर्वे, विभागीय उपआयुक्त गणेश पाटील, तसेच राज्य उत्पादन शुल्क नागपूरचे अधीक्षक सुरजकुमार रामोड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई 18 नोव्हेंबर रोजी करण्यात आली. यात विभागिय भरारी पथकाचा समावेश होता. बेसा येथील घटनास्थळी छापा टाकल्यानंतर येथे आढळून आलेले बनावट देशी / विदेशी दारु व तयार करण्याकरिता वापरलेले स्पिरीट 200 लीटर, विदेशी दारुचा तयार ब्लेंड 175 लीटर, बनावट देशी दारु 513 बल्क लिटर, देशी दारु तयार करण्यासाठी लागणारे इसेन्स 10 लीटर, बनावट रॉकेट देशी दारु नावाचे कागदी लेबल, जिवंत पत्री बुचे रिकाम्या बाटल्या, बनावट रॉयल स्टॅग विदेशी दारुचे जिवंत प्लॉस्टीक बुचे, रिकाम्या बाटल्या, एक दुचाकी वाहन व इतर साहीत्य असे एकूण 11,93,082/- रूपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आला.
या धडक कारवाईत मनिष नंदकिशोर जयस्वाल वय 48 वर्ष, विशाल शंभू मंडळ वय 28 वर्ष यांना या गुन्ह्यांमध्ये अटक करण्यात आली आहे. इतर फरार आरोपींचा शोध सुरु आहे. सदर कारवाई विभागीय भरारी पथकाचे निरीक्षक दशरथ क्षीरसागर, दुय्यम निरीक्षक, जगदीश यु पवार, मिलींद व लांबाडे, तसेच मंगेश कावळे निरीक्षक, दुय्यम निरीक्षक अमित. वा. क्षिरसागर, बळीराम ईथर यांनी सहकार्य केले. जवान सर्वश्री गजानन राठोड, राहुल सपकाळ, सुधीर मानकर, किरण वैध, सचिन आडोळे, विनोद डुंबरे यांनी ही कारवाई यशस्वीरित्या पार पाडली. सदरील गुन्हयाचा पुढील तपास निरीक्षक दशरथ क्षीरसागर निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, विभागीय भरारी पथक नागपूर विभाग, नागपूर हे करीत आहेत.
सध्या महाराष्ट्र राज्यातील देशी / विदेशी मद्याच्या किमतीत वाढ झालेली असून त्याकारणास्तव तुलनेने स्वस्त असलेले मद्य परराज्यातून अवैधपणे आयात होण्याची तसेच बनावट दारु निर्मिती करुन त्याची विक्री होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदर मद्य हे विषारी व आरोग्यास हानीकारक असू शकते. अशी मद्याची आयात व विक्री करणे ही बाब महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 नुसार शिक्षा/दंडास पात्र आहे.
अवैद्य मद्य निर्मिती, विक्री, वाहतुक या संदर्भात कोणतीही तक्रार असल्यास राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या टोल फ्री क्र. 18002339999 व व्हॉटस अॅप. 8422001133 यावर संपर्क साधावा, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाने केले आहे.




