अक्कलकोट, दुधनीवर शिवसेनेचा भगवा फडकणार : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
B1न्यूज मराठी नेटवर्क
अक्कलकोट : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अक्कलकोटमध्ये झालेल्या शिवसेनेच्या सभेत बोलताना अक्कलकोट आणि दुधनी या दोन्ही नगर परिषदांवर शिवसेनेचा भगवा फडकेल, असा विश्वास व्यक्त केला. त्यांनी नगराध्यक्षपदाचे उमेदवार रईसशेठ टीनवाला आणि प्रथमेश म्हेत्रे यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले.
शिंदे म्हणाले की, त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात अक्कलकोटसाठी ३८२ कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला मंजुरी देण्यात आली होती. सध्या शहरातील नऊ प्रमुख रस्त्यांची कामे सुरू असून, वाहनतळ, वॉटर एटीएम, चौक सुशोभीकरण, शौचालये, हत्ती तलाव उद्यान, व्यापारी केंद्र आणि भक्त निवास अशा विविध प्रकल्पांची अंमलबजावणी सुरू आहे. शहराला ७२ कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेलाही मंजुरी देण्यात आली असून गटार, ड्रेनेज, पथदिवे आणि स्वच्छता व्यवस्थेसाठीही सरकारकडून मोठा निधी उपलब्ध करून देत असल्याचे त्यांनी सांगितले.
अक्कलकोट हे तीर्थक्षेत्र म्हणून अधिक विकसित व्हावे आणि उत्तम सुविधा मिळाव्यात यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करण्यात येतील, तसेच दुधनीतील विकासकामांनाही निधी दिला जाईल, असे शिंदे यांनी स्पष्ट केले. सभेला माजी मंत्री सिद्धराम म्हेत्रे, महेश साठे, अमर पाटील, शंकर म्हेत्रे, शिवसेना पदाधिकारी, उमेदवार आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




