वाशिममध्ये बालकामगार मुक्ती अभियानाची धडाकेबाज कारवाई ; दोन किशोरवयीन मुलांची सुटका, आस्थापना मालकांवर कारवाई

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

वाशिम : बाल व किशोरवयीन कामगारमुक्त समाजाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकत आज वाशिममध्ये विशेष बाल व किशोरवयीन कामगार मुक्ती अभियान राबवण्यात आले. अमरावती कामगार उपआयुक्त चंद्रकांत राऊत , अकोला सहाय्यक कामगार आयुक्त राहुल काळे आणि अमरावती सहाय्यक कामगार आयुक्त श्रद्धा वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यवाही करण्यात आली.

अभियानाचे नेतृत्व पंकज खांडेकर, सरकारी कामगार अधिकारी वाशिम आणि दुकाने निरीक्षक योगेश गोटे यांनी केले. त्यांच्या सोबत वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रुईकर, जिल्हा प्रकल्प सहाय्यक निलीमा भोंगाडे, जिल्हा प्रकल्प पर्यवेक्षक चाईल्ड हेल्पलाइन (१०९८) गोपाल आरू, कामगार विभागातील धीरज राजगुरू, वैभव राठोड, अतुल ढेले, महेश पाटणकर यांचे सहकार्य लाभले. या संयुक्त कारवाईत पोलीस स्टेशन वाशिम शहर येथील पो.हे.कॉ. गजानन काळे (ब.न. १००५) यांचाही सक्रिय सहभाग होता.

बाल व किशोरवयीन कामगार (नियमन व निर्मूलन) अधिनियम १९९६ तसेच सुधारित अधिनियम २०१६ अंतर्गत घेतलेल्या या विशेष मोहिमेत दोन आस्थापनांवर छापे टाकण्यात आले. छाप्यादरम्यान दोन किशोरवयीन मुलांची सुटका करण्यात आली असून, संबंधित मालक १) नवीन मदनलाल मालवी २) ज्ञानेश्वर पांडुरंग सरनाईक यांच्या विरुद्ध वाशिम पोलीस स्टेशनमध्ये एफ.आय.आर. दाखल करण्यात आली आहे.

या कारवाईमुळे परिसरात बालकामगार निर्मूलनाबाबत सकारात्मक संदेश पसरला असून, कामगार विभागाकडून अशा अभियानांना पुढेही गती देण्याचे संकेत देण्यात आले आहेत.

बालकामगार कामावर ठेवणे हा कायदेशीरदृष्ट्या गुन्हा असून सामाजिकदृष्ट्याही अत्यंत घातक आहे. ही कुप्रथा संपूर्णपणे नष्ट करण्यासाठी वाशिम जिल्ह्यातील प्रत्येक सुजाण नागरिकाने आपली जबाबदारी ओळखणे आवश्यक आहे.
योगेश कुंभेजकर, जिल्हाधिकारी वाशिम

जिथे कुठे बालकामगार दिसून येतील, त्या प्रकरणांची रीतसर तक्रार कामगार कार्यालयाकडे करावी. तसेच अशा प्रकरणांमध्ये प्रशासनाला सहकार्य करून बालहक्कांच्या संरक्षणासाठी हातभार लावावा.
पंकज खांडेकर,सरकारी कामगार अधिकारी, वाशिम.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या