अहिल्यानगरच्या श्रद्धा ढवण‌ ला राष्ट्रीय गोपाळ रत्न – २०२५ पुरस्कार जाहीर

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

अहिल्यानगर, दि. २० – केंद्र शासनाच्या पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागातर्फे दिला जाणारा प्रतिष्ठेचा “राष्ट्रीय गोपाळ रत्न-२०२५” पुरस्कार जाहीर झाला असून राज्यातील दोन पशुपालकांपैकी अहिल्यानगर जिल्ह्यातील निघोज (ता. पारनेर) येथील श्रद्धा ढवण यांची राष्ट्रीय स्तरावर तृतीय क्रमांकासाठी निवड झाली आहे. देशी गाई-म्हशींच्या संगोपनातून उत्कृष्ट दुग्ध उत्पादन व व्यवस्थापन केल्याबद्दल हा मानाचा सन्मान त्यांना मिळत आहे.

या पुरस्काराचे वितरण २६ नोव्हेंबर रोजी दुग्ध दिनानिमित्त केंद्रीय पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय मंत्री राजीव रंजन सिंह तसेच राज्यमंत्री एम. पी. सिंह बघेल यांच्या हस्ते होणार आहे.

श्रद्धा ढवण यांच्या यशाबद्दल जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया (भाप्रसे) यांनी त्यांचा गौरव करून अभिनंदन केले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी (भाप्रसे), जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. उमेश पाटील, सहाय्यक आयुक्त डॉ. संतोष पालवे, डॉ. दशरथ दिघे, डॉ. मुकुंद राजळे, डॉ. सोपान नांदे यांसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

“वडिलोपार्जित दुग्ध व्यवसायास आधुनिक तंत्रज्ञान, मूल्यवर्धन व दुग्ध प्रक्रिया उपक्रमांची सांगड घातल्याने व्यवसाय अधिक शाश्वत व फायदेशीर झाला. दोन म्हशींपासून सुरुवात करून आज त्या ६९ म्हशींचे संगोपन करत आहोत. “स्वच्छ दूध निर्मिती” हा हेतू जपत त्यांनी बायोगॅस निर्मिती व दुग्धजन्य पदार्थ उत्पादनाद्वारे व्यवसायाला बहुविधता दिली आहे, अशी प्रतिक्रिया श्रद्धा ढवण यांनी दिली.

देशभरात दूध भेसळीवरील चर्चेच्या पार्श्वभूमीवर, “जे दूध मी खाऊ शकेन तेच ग्राहकांना देईन” हा निर्धार बाळगत त्या स्वच्छ व आरोग्यदायी दूधनिर्मिती करत असल्याचेही त्यांनी सांगितले.

जिल्हा पशुसंवर्धन विभागाच्या मार्गदर्शनाखाली आधुनिक व्यवस्थापन, अल्प संप्रेरक व प्रतिजैवकांचा वापर, पशुधनासाठी अनुकूल वातावरण ठेवणे या तत्त्वांचा अवलंब केला असून दूध थेट विक्री केंद्रांद्वारे ग्राहकांपर्यंत पोहोचवले जाते.

या उल्लेखनीय कामगिरीबद्दल राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, पशुसंवर्धन विभागाचे सचिव डॉ. रामस्वामी, आयुक्त प्रवीणकुमार देवरे आणि प्रादेशिक पशुसंवर्धन सहायुक्त बी. आर. नरबाडे यांनी श्रद्धा ढवण यांचे अभिनंदन केले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या