तर शेतकरी कारखानदारांच्या गाड्या पेटवतील…शंकर गायकवाड
बार्शी येथील निमजाई कारखान्याचे चेअरमन निंबाळकर यांना निवेदन देताना शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शंकर गायकवाड व शेतकरी
B1न्यूज मराठी नेटवर्क
वैराग : मागील दहा वर्षांमध्ये ऊस उत्पादन खर्चामध्ये चौपटीने वाढ झाली परंतु ऊसाचा दर मात्र अद्यापही तोच रेंगाळत पडलेला असून, सिझन चालू होऊन वीस दिवस होत आले तरी सुद्धा कुठलाच साखर कारखानदार ऊस दर जाहीर करत नाही, त्यामुळे बार्शी तालुक्यातील जवळगाव दोन येथे शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शंकर गायकवाड यांचे नेतृत्वाखाली ऊस उत्पादकांची बैठक पार पडली.
यावेळी गायकवाड म्हणाले की, राज्यातील गुळपावडर तयार करणाऱ्या कारखान्यांसह साखर कारखानदार गाळप सुरू होऊन महिना होत आला तरी अद्यापही ऊस दर जाहीर न करता ऊसाची कमी दरात लूट करू लागलेले आहेत, आणि सरकारला तक्रारी देऊन सुद्धा कारवाई होत नाही, मग कारखानदार हे काय सरकारचे बाप लागतात का? असा सवाल उपस्थित करत, शेतकरी आता वैतागला असून ऊसाला कमी दर देणाऱ्या कारखानदारांच्या गाड्या पेटवतील असा गंभीर इशाराही यावेळी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना शंकर गायकवाड यांनी दिला.
बैठकीनंतर लागलीच विविध कारखान्यावरती दिनांक 23 नोव्हेंबर पासून आंदोलने करणार असल्याची निवेदने सुद्धा देण्यात आली. त्यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे हनुमंत कापसे, कांदा उत्पादक संघटनेचे जिल्हाध्यक्ष नितीन कापसे, दयानंद ढेंगळे, प्रदीप पाटील, आबासाहेब डिसले, किसन डिसले, सत्यवान भोसले, राजाभाऊ कापसे, शहाजी कापसे, बळीराम कापसे, दयानंद वीर आदींसह पंचक्रोशीतील शेतकरी उपस्थित होते.




