अनगर नगरपंचायत | उज्वला थिटे-पाटील यांचा नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल
B1न्यूज मराठी नेटवर्क
मोहोळ : अनगर नगरपंचायतीत आज पहाटेच महत्त्वाची राजकीय घडामोड घडल्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तर्फे उज्वला थिटे-पाटील यांनी नगराध्यक्षपदासाठी घड्याळ चिन्हावर उमेदवारी अर्ज दाखल केला. जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा अर्ज सादर करण्यात आला.
अर्ज दाखल केल्यानंतर सोशल मीडियाद्वारे प्रतिक्रिया देताना थिटे-पाटील म्हणाल्या,“मोहोळच्या बहिणींनो, आज आपण इतिहास रचला.”
त्यांनी पुढे सांगितले की नागरिकांची सेवा, पारदर्शक प्रशासन आणि स्थानिक विकास या आधारावर काम करण्याचा आमचा दृढ निश्चय आहे. गावातील महिला-पुरुष, शेतकरी, युवक आणि लघुउद्योजक यांच्यासाठी ठोस निर्णय घेण्याचे आमचे प्राधान्य असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
अनगर नगरपंचायत निवडणूक नगराध्यक्ष पदाकरिता उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार) पक्षाच्या श्रीमती उज्वला थिटे यांना पहाटे अनगर येथे दाखल होऊन पोलीस बंदोबस्तात अनगर नगरपंचायत कार्यालय गाठावे लागले होते.
सोशल मीडियावर या संदर्भात फोटो आणि व्हिडिओ त्यांनी प्रसिद्ध केले आहेत.
दरम्यान, अनगरमध्ये अनेक वर्षांपासून सुरू असलेली बिनविरोध निवडणुकीची परंपरा यंदा मोडत असून स्पर्धात्मक लढत पाहायला मिळणार आहे. स्थानिक राजकारणातील हा बदल आगामी समीकरणांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.




