लोकमंगलच्या सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यात 52 जोडप्यांच्या रेशीमगाठी जिल्हा पर्यटन थीममुळे सोहळा ठरला आकर्षणाचा केंद्रबिंदू
B1न्यूज मराठी नेटवर्क
सोलापूर : रविवारी सायंकाळी सूर्य अस्ताला जात असताना वातावरणात मंगलध्वनी, ढोल-ताशांचा गजर आणि विवाहसोहळ्याची लगबग पसरली होती. लोकमंगल फाउंडेशनतर्फे आयोजित सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यात 52 जोडपी रेशमी जोडीने व्यासपीठावर दाखल झाली आणि हजारोंच्या उपस्थितीत त्यांचे मंगलकार्यासाठी रेशीमगाठ बांधल्या गेल्या. नवदांपत्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची लकेर झळकत होती तर सभोवताली उपस्थित असलेले नातेवाईक व मान्यवरही भावनिक क्षणांचे साक्षीदार बनले.
हा भव्य सोहळा माजी सहकार मंत्री तथा आमदार सुभाष देशमुख यांच्या प्रेरणेतून विजापूर रोडवरील शिवाजी अध्यापक विद्यालय (डी. एड. कॉलेज) मैदानावर रविवार15 रोजी पार पडला. परिसरात पाहुण्यांची गर्दी, रंगीबेरंगी सजावट, सुव्यवस्थीत व्यवस्थापन आणि आकर्षक थीममुळे संपूर्ण मैदान उत्सवाचे रंगमंच बनले होते. यावेळी आमदार सुभाष देशमुख आणि त्यांच्या पत्नी स्मिता देशमुख यांनी कन्यादान केले. यावेळी 49 हिंदू तर तीन बौद्ध विवाह पार पडले.
आ. देशमुख म्हणाले, दक्षिण तालुक्यातील प्रत्येक गावात सामुदायिक विवाह सोहळा राबवण्याचा संकल्प व्यक्त केला. “समाजातील वधू-वरांना आर्थिक व मानसिक आधार देणे, आणि विवाहातील अनाठायी खर्चाला आळा घालणे हा या उपक्रमामागचा मुख्य हेतू आहे.
संपूर्ण दिवस उत्साहमय कार्यक्रम सकाळी सर्व वधू-वरांसाठी समुपदेशन आयोजित करण्यात आले. विवाहोत्तर आयुष्य, कुटुंब व्यवस्थापन आणि आरोग्यविषयक मार्गदर्शन देऊन दांपत्यांना सक्षम केले गेले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते वधूंना शालू व वरांना सपारी, तसेच रुखवत साहित्याचे वाटप करण्यात आले.
सोहळा स्थळी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याचबरोबर, वधू-वरांसोबत आलेल्या नातेवाईकांसाठी चपाती, भाजी आणि बुंदीचा लाडू असे स्वादिष्ट भोजन देण्यात आले. उघड्या बग्गीतून काढण्यात आलेली वधू-वरांची मिरवणूक हा सोहळ्याचा विशेष आकर्षण ठरली. वाजत गाजत, सनई-चौघड्याच्या निनादात ही मिरवणूक सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.
जिल्हा पर्यटन थीमची अनोखी अनुभूती मैदान झाले पर्यटन प्रदर्शन या वर्षीचा विवाह सोहळा विशेष ठरला तो ‘जिल्हा पर्यटन थीम’मुळे. आमदार सुभाष देशमुख यांनी सुरु केलेल्या जिल्हा पर्यटन महोत्सवाच्या धर्तीवर या सोहळ्यात पर्यटनाची झलक सादर करण्यात आली होती.
मैदानावर लापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक ठिकाणांचे पॅनेल्स, सांस्कृतिक वारशाची ओळख करून देणारे माहिती फलक, विविध गावांच्या विशेष परंपरांची मांडणी, पर्यटनदृष्ट्या महत्त्वाची स्थळे दर्शविणारे स्टॉल्स आदी विविध माध्यमातून जिल्ह्याची ओळख जिवंत करण्यात आली.
विशेष म्हणजे, अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती स्थळावर प्रदर्शित करण्यात आली होती. “भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे” हा संदेश उपस्थितांमध्ये श्रद्धा आणि आत्मविश्वास निर्माण करणारा ठरला.
मान्यवरांची मोठी उपस्थिती — सोहळ्याला मिळाला आध्यात्मिक व सामाजिक दरारा
या विवाह सोहळ्याला धार्मिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. पंढरपूर मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, आ. सुभाष देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख बळीराम काका साठे लोकमंगल फाउंडेशनचे अध्यक्ष रोहन देशमुख, मनीष देशमुख, पंचाक्षरी शिवाचार्य महास्वामीजी (माळकवठे), अभिनव बसवलींग महास्वामीजी (नागणसूर), श्रीकंठ शिवाचार्य महास्वामीजी (नागणसूर), सुधाकर महाराज इंगळे महाराज, बळीराम जांभळे महाराज, भागवत चौरे महाराज, संजय पाटील महाराज, नाशिककर महाराज यांच्यासह अनेक मान्यवर महाराज मंडळी तसेच आमदार विजय देशमुख, भाजप शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, राम जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती. त्यावेळी उपस्थित मान्यवरांचा लोकमंगल फाउंडेशनचे अध्यक्ष रोहन देशमुख यांनी सत्कार केला.
सोहळ्याला राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनीही विशेष भेट देऊन नवदांपत्यांना आशीर्वाद दिले . वधू-वरांना त्यांनी मार्गदर्शन करत वैवाहिक जीवनातील परस्पर समजूतदारपणाचे महत्त्व पटवून दिले. आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते राज्यपाल बागडे यांचा सत्कार करून स्वागत करण्यात आले.




