आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यात ‘महाराष्ट्र दिन’ दिमाखात साजरा, सांस्कृतिक वैभवाचे दिल्लीत अनोखे प्रदर्शन

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

नवी दिल्ली, १५ : भारताची आर्थिक राजधानी असलेल्या महाराष्ट्राचा समृद्ध सांस्कृतिक आणि लोककला वारसा देश-विदेशातील प्रतिनिधींपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने ४४व्या भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यात (IITF) आज सायंकाळी ‘महाराष्ट्र दिन’ अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. नवी दिल्लीतील प्रगती मैदानावर आयोजित या सोहळ्यात राज्याच्या मातीतील कलांचे मनोहारी दर्शन घडले.

या दिमाखदार महाराष्ट्र दिन’ सोहळ्याचे उद्घाटन महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विकास पानसरे यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी सचिव प्रफुल्ल पाठक, महाराष्ट्र परिचय केंद्राचे संचालक हेमराज बागुल, सदनाचे सहायक निवासी आयुक्त नितीन शेंडे, स्मिता शेलार सहव्यवस्थापकीय संचालक प्रशाली दिघावकर, जनसंपर्क अधिकारी मनीषा पिंगळे आदी उपस्थित होते.

लोकरंग महाराष्ट्राचे : लोककलांचा मनोहारी नृत्याविष्कार

सुप्रसिद्ध निर्माता आणि हिंदी चित्रपट संगीतातील नामवंत तालवादक शशांक कल्याणकर यांच्या ‘एक संगीत संध्या, मुंबई’ संघाने महाराष्ट्राच्या ग्रामीण आणि आध्यात्मिक संस्कृतीचे अत्यंत प्रभावी चित्रण केले. नृत्य दिग्दर्शक संदेश पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘लोकरंग महाराष्ट्राचे’ या कार्यक्रमात ५० हून अधिक कलावंतांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाची सुरुवात गणपती वंदनेने झाली आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील पहाटेचे चित्रण करणारे वासुदेव नृत्य सादर झाले. विशेष म्हणजे, पंढरपूरच्या वारीचे दर्शन घडवणारे दिंडी नृत्य जेव्हा सादर झाले आणि प्रेक्षकांमधून वारकऱ्यांची दिंडी निघाली, तेव्हा उपस्थितांनी उभे राहून मानवंदना दिली.

या रंगारंग कार्यक्रमात बाळ शिवाजी जन्मोत्सव, राज्याभिषेक यांसारख्या ऐतिहासिक क्षणांसह शेतकरी नृत्य, वाघ्या मुरळी, गोंधळ, जोगवा, आदिवासी ठाकर नृत्य, लावणी आणि कोळी नृत्य यांसारख्या विविध लोककलांनी रसिकांच्या टाळ्या मिळवल्या. संतांच्या अध्यात्मिक विचारांचे उलगडणारे भारूड आदींनी प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री धनश्री दळवी यांची दिलखेचक अदाकारी आणि अभिनेता, निवेदक व रेडिओ जॉकी आरजे अमित काकडे यांचे समर्पक निवेदन यामुळे दिल्लीची ती संध्याकाळ खऱ्या अर्थाने ‘महाराष्ट्राची सैर’ बनली. विविध लोककला आणि लोकनृत्यांचा आविष्कार असलेल्या या कार्यक्रमाने महाराष्ट्राचे प्रतिबिंब प्रगती मैदानावर उभे केले आणि उपस्थितांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाची सांगता महाराष्ट्राच्या राज्य गीताने झाली.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या