सहकारी बँकेमुळे स्थानिक भांडवल निर्मिती व विकास साध्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
B1न्यूज मराठी नेटवर्क
अमरावती, दि. 30 : ज्या ठिकाणी चांगल्या बँक निर्माण होतात, त्या ठिकाणी आर्थिक सक्षमता वाढते. नव उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी या बँक महत्त्वपूर्ण ठरतात. सहकारी बँकेमुळे स्थानिक भांडवल निर्मिती व विकास साध्य होतो, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज अमरावती येथील अभिनंदन अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. तत्पूर्वी त्यांनी ‘अभिनंदन हाईट्स’ या इमारतीची प्रत्यक्ष पाहणी केली. नागरिकांच्या सुविधेसाठी स्थापन करण्यात आलेल्या अत्याधुनिक सेवा-सुविधेबाबत त्यांनी बँकेचे अभिनंदन केले.
सहकार राज्यमंत्री पंकज भोयर, आमदार सुलभाताई खोडके, आमदार रवी राणा, आमदार उमेश उर्फ चंदु यावलकर, प्रवीण पोटे-पाटील, भारतीय जैन संघटनेचे संस्थापक शांतीलालजी मुथ्था, बँकेचे संस्थापक हुकुमचंद डागा, अभिनंदन अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष ॲड. विजय बोथरा आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, सहकारी बँकेमुळे तळागाळातील नागरिकांचा विकास होतो. शेतकरी व लघु उद्योगांना कर्ज त्वरित कर्ज व बचत सुविधा मिळते. ज्यांना व्यवसाय, उद्योग धंदा स्थापन करावयाचा आहे, त्यांना सुरुवातीला कर्ज लागते. त्यावेळी या बँकेंचे प्रोत्साहन व सहकार्य महत्त्वपूर्ण ठरते. राज्यात सहकारी बँकांनी कालानुरुप बदल केले आहेत. त्यामुळे राष्ट्रीयकृत बँकांच्या स्पर्धेत त्या उत्तम स्थान टिकवून आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सहकाराचे महत्त्व जाणून ‘सहकारिता मंत्रालय ‘ स्थापन केले आहे. यामुळे सहकार क्षेत्रात मोठे बदल होत आहे .यातून ‘सहकारातून समृद्धीकडे’ हा मार्ग जात आहे. गुणवत्तापूर्ण कार्य करून ‘अभिनंदन सहकारी बँक’ सहकार क्षेत्रात चांगले योगदान देत असल्याचे ते यावेळी म्हणाले.
सहकारी बँक नागरिकांना आपली बँक वाटते. यातील अभिनंदन बँक ही सर्व मानकांवर उत्तम कार्य करीत आहे. अभिनंदन बँकेला सहकार क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल राज्य शासनामार्फत गौरविण्यात आले आहे. ग्राहकांनी या बँकेत ३७३.७७ कोटी जमा केले आहेत. बँकेने २५३.९७ कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. कर्जाची गुणवत्ता
नेट एन.पी.ए. हे शून्य टक्के आहे. नेट एनपीए हे बँकेच्या उत्कृष्ट व्यवस्थापनाचे लक्षण आहे. बँक योग्य आर्थिक नियोजन करून आपल्या ग्राहकांना तत्पर आणि अत्याधुनिक सेवा पुरवित असल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते बँकेचे संस्थापक हुकुमचंद डागा यांना शाल -श्रीफळ तसेच सन्मानचिन्ह देवून सन्मानित करण्यात आले. कॅम्प परिसरामध्ये अत्याधुनिक सेवा-सुविधांसह अभिनंदन बँकेची पाच मजली इमारत उभारण्यात आली आहे. या इमारतीचे एकूण बांधकाम क्षेत्रफळ २२ हजार चौ. फुट आहे.
बँकेचे अध्यक्ष विजय बोथरा यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे संचालन प्राजक्ता चौधरी यांनी तर आभार संचालक मंडळाचे अध्यक्ष सुदर्शन गांग यांनी मानले.




