माजी सैनिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध – मेजर जनरल विशाल अगरवाल
माजी सैनिक रॅलीचे आयोजन
B1न्यूज मराठी नेटवर्क
अहिल्यानगर, दि. २५ : माजी सैनिक हे अनुभव, शिस्त व देशभक्तीचे प्रेरणास्त्रोत असून आजही ते सर्वांना प्रेरणा देतात. माजी सैनिकांच्या समस्या सोडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याची ग्वाही मेजर जनरल विशाल अगरवाल यांनी दिली.
एमआयआरसी (मेकेनाइज्ड इन्फंट्री रेजीमेंटल सेंटर अँड स्कूल) येथील मैदानावर माजी सैनिक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी अगरवाल बोलत होते.
यावेळी मेजर जनरल विक्रम वर्मा, ब्रिगेडिअर सुनील कुमार, ब्रिगेडिअर राजेंद्रसिंह रावत, सैनिक कल्याण निधीचे अध्यक्ष दीपक थांगे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी विद्यासागर कोरडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे आदी मान्यवर उपस्थित होते.
मेजर जनरल अगरवाल म्हणाले, सैन्यातून निवृत्त झाल्यानंतरही माजी सैनिक हे समाजाचे आधारस्तंभ आहेत. देशसेवा करत असताना तसेच सेवानिवृत्तीनंतर माजी सैनिकांचे विविध क्षेत्रातील योगदान उल्लेखनीय आहे. माजी सैनिकांसाठी आरोग्य, रोजगार व कल्याणाच्या विविध योजना शासनामार्फत राबविल्या जात आहेत. तसेच ‘स्पर्श’ प्रणालीच्या माध्यमातून माजी सैनिकांसाठी तक्रार निवारण सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याचा अधिकाधिक लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
यावेळी वीरनारी उमा कुणाल गोसावी, प्रतिभा समुद्रे, श्रीमती रंजनाबाई जाधव, गोदावरी तावरे, दीपाली गायकर, मधुमालती केंद्रे, वीर माता मोतीबाई नागरगोजे, गोदाबाई नरवडे व सीताबाई राख यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमास अहिल्यानगर, सोलापूर, बीड, लातूर व धाराशिव जिल्ह्यातील विविध सैन्यदलांमध्ये कार्यरत राहिलेले माजी सैनिक, त्यांचे कुटुंबीय, वीरनारी, वीरमाता तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विविध स्टॉल्स व आरोग्य शिबिराचे आयोजन माजी सैनिकांसाठी लष्कर विभाग व शासनामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांचे स्टॉल परिसरात उभारण्यात आले. तसेच आरोग्य शिबिराचे आयोजनही करण्यात आले.




