एक दिवा सैनिकांसाठी – दिवाळी सकाळ सैनिकांच्या परिवारासोबत उपक्रम उत्साहात

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

सांगली : ‘दिवाळी सकाळ सैनिका परिवारासोबत’ साजरी करण्याच्या उद्देशाने सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून ‘एक दिवा सैनिकांसाठी’ हा अभिनव उपक्रम आज महावीर चक्र विजेते शहीद पांडुरंग साळुंखे संकुल सांगली येथे उत्साहात पार पडला.

यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे, विंग कमांडर प्रकाश नवले (शौर्य चक्र) (निवृत्त), ग्रुप कॅप्टन श्रीकांत वालवडकर, कर्नल भूषण कल्याणी (निवृत्त), जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल डॉ. भीमसेन चवदार (निवृत्त) यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी ‘सांगली व्हिजन २०३०’ बाबत सर्व सैनिकांना माहिती दिली. देशाची सेवा करून निवृत्त झालेल्या सैनिकांचे पाठबळ प्रशासनाला मिळावे, या उद्देशाने माजी सैनिकांनी समाजात सक्रिय कार्य करावे, असे आवाहन केले. सैनिकांप्रती असणारे त्यांचे प्रेम, भावना आणि कर्तव्यनिष्ठा या गुणांचा अनुभव या कार्यक्रमात उपस्थितांना घेता आला.

ग्रुप कॅप्टन वालवडकर यांनी मनोगत व्यक्त केले. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी डॉ. भीमसेन चवदार यांनी प्रास्ताविक केले. ध्वज दिन निधीसाठी सुषमा सुरेश बाळ यांनी 1 लाख रूपये, मिलिंद तनवडे यांनी 30 हजार रूपये, ॲड. सत्यजित शेगूंशी यांनी 21 हजार रूपये धनादेश सुपूर्द केल्याबद्दल तसेच प्राचार्य ए.व्ही. कुलकर्णी यांनी 5 लाख रूपयांची सैनिक संकुलात विकास कामे केल्याबद्दल डॉ. चवदार यांनी या सर्वांचे आभार मानून 12 वर्षात प्रथमच ध्वज दिन निधीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लक्ष्मण गवळी यांनी आभार मानले. सूत्रसंचालन मुलांचे वसतिगृह अधीक्षक गजानन जाधव यांनी केले.

या कार्यक्रमाला वीरपत्नी, वीरमाता-पिता, माजी सैनिक, माजी सैनिक विधवा, अवलंबित तसेच तालुका निहाय सैनिक संघटनेचे अध्यक्ष व पदाधिकारी, नागरिक, सैनिकी वसतिगृहातील मुले व त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सर्वप्रथम मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करून शहिदांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. राष्ट्रगीत व राज्य गीताने या कार्यक्रमाची सांगता झाली. त्यानंतर सर्व मान्यवर आणि उपस्थित नागरिक-अधिकाऱ्यांनी सैनिक परिवारासोबत दिवाळीचा आनंद साजरा केला.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या