शासकीय मदतीपासून एकही बाधित वंचित राहू नये – जिल्हाधिकारी अमोल येडगे
B1न्यूज मराठी नेटवर्क
कोल्हापूर : राज्यात जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे अनेक नागरिक शेतकरी बाधित झाले आहेत या बाधितांसाठी त्यांना राज्य शासनाने विशेष मदत (रिलीफ – पॅकेज) घोषित केले आहे. या विशेष मदतीतून जिल्ह्यातील एकही बाधित वंचित राहू नये असे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले .
राजर्षी शाहू सभागृहात दुष्काळ सदृश्य परिस्थितीत लागू असणाऱ्या सवलती देण्याच्या दृष्टीने बैठक आयोजित करण्यात आली होती.
ते पुढे म्हणाले, शासनाने कोल्हापूर जिल्ह्यातील कागल ,शिरोळ , पन्हाळा हे अंशतः बाधित तर करवीर, राधानगरी, गगनबावडा , आजरा व चंदगड हे तालुके पूर्णतः बाधित असल्याचे जाहीर केले असून याभागातील नागरिकांसाठी नागरिकांसाठी शेतकऱ्यांसाठी शासनाने जमीन महसुली सूट , सरकारी कर्जाचे पुनर्गठन,शेती निगडित कर्जाच्या वसुलीस एका वर्षासाठी स्थगिती दिली आहे.तिमाही वीज बिलात माफी (सूट) त्याचबरोबर इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा शुल्कात माफी जाहीर केली आहे. राज्य शासनाने या सवलती जाहीर केल्या असून या सवलतीच्या अनुषंगाने एकही व्यक्ती मदतीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता संबंधितांनी घ्यावी.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित तालुक्यांमध्ये शासकीय मदतीपासून कोणी वंचित राहिले आहे का याचा दुरदृष्यप्रणालीद्वारे आढावा घेतला. या बैठकीसाठी निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली सर्वसाधारण तहसीलदार स्वप्निल पवार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.




