सोलापूर महानगरपालिकेचा स्वच्छतेचा अनुकरणीय उपक्रम: गणेश विसर्जनानंतर शहरात झपाट्याने स्वच्छता मोहीम
B1न्यूज मराठी नेटवर्क
सोलापूर, दि. ७ सप्टेंबर : सोलापूर शहरात गणेशोत्सवाची सांगता शनिवारी, दि. ७ सप्टेंबर रोजी भव्य मिरवणुकीने करण्यात आली. शहरातील विविध सार्वजनिक गणेश मंडळांच्या शेकडो मूर्तींचे विसर्जन आठ विसर्जन तलावांमध्ये आणि अनेक विहिरींमध्ये मोठ्या प्रमाणावर करण्यात आले. लाखो कौटुंबिक गणपतींचे विसर्जनही शांततेत पार पडले.
सोलापूर महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने यासाठी एकूण ६८ ठिकाणी मूर्ती आणि निर्माल्य संकलन केंद्रांची स्थापना केली होती. या केंद्रांवर महानगरपालिकेचे कर्मचारी सक्रिय होते आणि त्यांनी मूर्ती व निर्माल्याचे संकलन केले. विशेष म्हणजे, डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या सदस्यांनी ६० टन निर्माल्य संकलन करून समाजासमोर स्वच्छतेचा आदर्श ठेवला.
८५० सफाई कर्मचारी, १५ घंटागाड्या आणि तत्पर व्यवस्थापन
महानगरपालिकेने मिरवणुकीच्या मार्गांवर आणि विसर्जन स्थळी ८५० सफाई कर्मचाऱ्यांची नेमणूक केली होती. मूर्ती विसर्जनानंतर लगेचच पहाटे ५ ते ८ वाजेपर्यंत, जवळपास २५० कर्मचाऱ्यांनी सर्व मिरवणूक मार्गांवर हार-फुले, पूजा साहित्य, प्लास्टिक कचरा व गुलाल यांची झाडलोट केली. यासाठी तीन ट्रॅक्टर, १५ घंटागाड्या आणि २ रिफ्युज कॉम्पॅक्टर वापरण्यात आले.
तसेच, चार ठिकाणी फिरते शौचालय उपलब्ध करून देण्यात आले होते आणि त्यांची दिवसातून तीन वेळा स्वच्छता करण्यात आली.
पैगंबर जयंतीसाठीही स्वच्छतेचे विशेष नियोजन
रविवार, ७ सप्टेंबर रोजी मुस्लिम धर्मीयांच्या मो. पैगंबर जयंती निमित्त आयोजित जुलूस मार्गासाठीही विशेष झाडलोट व स्वच्छतेचे नियोजन करण्यात आले होते. सफाई कर्मचारी, फिरते शौचालय, घंटागाड्या यांची तयारी महापालिकेकडून करण्यात आली होती.
महानगरपालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे आणि अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली घनकचरा व्यवस्थापन विभाग, नगर अभियंता विभाग आणि इतर संबंधित यंत्रणांनी संयुक्तपणे योग्य नियोजन करून शहरातील स्वच्छता सुनिश्चित केली.




