जिल्हाधिकारी कार्यालयात अनुकंपाच्या ४५ पदांसाठी रोजगार मेळावा
B1न्यूज मराठी नेटवर्क
अमरावती : जिल्हाधिकारी कार्यालयात अनुकंपा तत्त्वावरील ४५ पदांवर नियुक्ती देण्यासाठी आज रोजगार मेळावा पार पडला. मेळाव्याचे उद्घाटन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या हस्ते झाले.
यावेळी जिल्हाधिकारी येरेकर यांनी अनुकंपा नियुक्ती ही शासनाची सहानुभूतीपूर्ण प्रक्रिया आहे. पात्र उमेदवारांना याचा निश्चितच लाभ मिळेल. अनुकंपा हा प्राधान्याचा असून हे प्रकरण संवेदनशीलपणे हाताळावे, अशा सूचना केल्या.
अनुकंपाधारकांच्या अडचणी जाणून शासन निर्णय काढला आहे. संपूर्ण राज्यामध्ये १५ सप्टेंबरपर्यंत ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यानंतर अनुकंपाधारक व लोकसेवा आयोगामार्फत नियुक्ती झालेल्यांना नियुक्तीपत्र देण्यात येणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी आवश्यक असलेल्या पदाचे ऑप्शन विचारपूर्वक द्यावे. रिक्त पदानुसार ही भरती प्रक्रिया होणार आहे. त्यामुळे सर्व विभागप्रमुखांना १५ सप्टेंबर २०२५ पूर्वी नियुक्तीची कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
मेळाव्यामध्ये गट-क सामाईक प्रतीक्षा यादीतील एकूण १५० उमेदवारांपैकी ११६ उमेदवार उपस्थित होते. या उमेदवारांकडून शासकीय सेवेत नियुक्तीसाठी पसंतीक्रम भरून घेण्यात आला. विविध विभागांतील रिक्त असलेल्या एकूण ४५ पदांवर नियुक्ती देण्यासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला.
अंतिम शिफारसपत्र प्राप्त उमेदवारांना संबंधित विभागांमार्फत एकत्रितपणे नियुक्तीपत्र देण्यासाठी १५ सप्टेंबर २०२५ रोजी नियोजन भवन येथे मेळावा घेण्यात येणार आहे. निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी विविध विभागांतील अधिकारी, उमेदवार आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




