भारती विद्यापीठ, सोलापूरमध्ये पर्यावरणपूरक गणेशोत्सव उत्साहात साजरा

B1न्यूज मराठी नेटवर्क
सोलापूर : भारती विद्यापीठ, सोलापूर येथे यंदाही गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने आणि पारंपरिक उत्साहात साजरा करण्यात आला. शाडू मातीपासून तयार केलेल्या गणेश मूर्तीची स्थापना करून, पारंपरिक वाद्यांच्या गजरात गणरायाची मिरवणूक काढण्यात आली.
संस्थेचा कॅम्पस ‘ग्रीन कॅम्पस’ म्हणून प्रसिद्ध असून, परिसरात एक हजाराहून अधिक वृक्ष लागवड केल्यामुळे परिसर अधिक हिरवागार व शितल झाला आहे. पर्यावरण संवर्धनाची जाणीव ठेवत, इको-फ्रेंडली गणेश मूर्तीची स्थापना करण्याची परंपरा विद्यापीठाने यंदाही कायम ठेवली.
गणेश विसर्जनाच्या वेळीही पारंपरिक पद्धतीने आणि पर्यावरणपूरक विचाराने मातीच्या कुंडीतच मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. या उपक्रमात विद्यार्थी व प्राध्यापक यांनी सक्रिय सहभाग घेतला.
कार्यक्रमाच्या माध्यमातून “पर्यावरण वाचवा – भविष्य सुरक्षित करा” असा सकारात्मक संदेश देण्यात आला. विद्यापीठाच्या या उपक्रमाचे विविध स्तरांतून कौतुक करण्यात येत आहे.



