कृषि विज्ञान केंद्राच्यावतीने शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम
B1न्यूज मराठी नेटवर्क
यवतमाळ : भारतीय कृषि अनुसंधान परिषद अंतर्गत केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर व कृषि विज्ञान केंद्राच्या संयुक्त विद्यमाने दि. 26 ऑगस्ट रोजी अमाला, कळंब येथे अति सघन कापूस लागवड प्रकल्पा अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख कृषि विज्ञान केंद्राचे प्रमुख वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. दीपक कछवे होते. विषय विशेषज्ञ अभियांत्रिकी राहुल चव्हाण, विस्तार शिक्षण विभागाचे डॅा. मयूर ढोले, नुझिवेडू सीड्सचे सुदर्शन पतंगे, सरपंच कविता कलाके, मंडळ कृषी अधिकारी महेंद्र ओकारे, तलाठी चेतन कोडापे, शिवानी बावणकर, रविंद्र राठोड, नयन ठाकरे, अमोल वाळके उपस्थित होते.
विदर्भातील पिक कापसाच्या उत्पादन क्षमतेमध्ये वाढ करण्याच्यादृष्टीने जिल्ह्यातील यवतमाळ, राळेगाव, कळंब, बाभुळगाव, वणी, मारेगाव, घाटंजी, आर्णी तालुक्यात केंद्रीय कापूस संशोधन संस्था व कृषि विज्ञान केंद्राच्या संयुक्त विद्यमाने विशेष कापूस प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पामध्ये कापसाच्या उत्पादन वाढीसाठी सघन व अतिसघन कापूस लागवड तंत्रज्ञानाच्यादृष्टीने शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. दीपक कछवे यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये शेतकऱ्यांना कापूस पिकाच्या लागवड पध्दतीबद्दल सविस्तर माहिती दिली. लागवडीसाठी योग्य अंतर व मुलभूत अन्नद्रव्य व्यवस्थापनामुळे बोंडाची संख्या व आकार वाढवून उत्पादनात वाढ होते. मातीच्या प्रकारानुसार शेतकऱ्यांनी कोणते लागवड अंतर निवडावे याबाबत व कापूस पिकाचे कमी खर्चीक व्यवस्थापन या विषयी मार्गदर्शन केले.
तांत्रिक सत्रामध्ये राहुल चव्हाण यांनी अतिसघन कापूस लागवड पद्धतीमध्ये न्यूम्याटीक प्लॅन्टरचा वापर शेतकऱ्यांसाठी कशा प्रकारे फायदेशीर ठरत आहे, याबाबत मार्गदर्शन केले. मयूर ढोले यांनी कृषी विज्ञान केंद्रांमार्फत शेतकरी शास्त्रज्ञ संवाद, हवामान बदल-प्रतिबंधक शेती आणि इतर नवीन तंत्रज्ञानाविषयी जागरुकता निर्माण करून शेतीच्या पद्धती सुधारल्या जातात, ज्यामुळे शेतकरी आणि ग्रामीण समुदायांचे ज्ञान व कौशल्ये वाढतात याबबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचलन रविंद्र राठोड यांनी केले तर आभार राहुल चव्हाण यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिवानी बावणकर, नयन ठाकरे, अमोल वाळके यांनी परिश्रम घेतले.




