मेळघाट आरोग्य परिक्रमेतील पहिल्या शिबीरात 207 रूग्णांची तपासणी
B1न्यूज मराठी नेटवर्क
अमरावती, दि. 2 : पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्देशानुसार मेळघाट आरोग्य परिक्रमा अभियान राबविण्यात येत आहे. अभियानांतर्गत मेळघाटातील गावांमध्ये 56 आरोग्य शिबीर घेण्यात येणार आहे. या शिबीरात सोनोग्राफी, एक्स-रे सह औषधोपचार मोफत देण्यात येत आहे.
या अभियानातील चिखलदरा येथील पहिल्या शिबीरात 207 रूग्णांची तपासणी करण्यात आली. मेळघाट परिसरात या अभियानांतर्गत 30 मे पासून आरोग्य शिबिर अभियान राबविण्यात येत आहे. यातील चिखलदरा येथे शिबीरात 208 रुग्णांची तपासणी करण्यात आली.
या शिबिरात गर्भवती माता, वृद्ध, बालके, महिलांनी आरोग्य चिकित्सेचा लाभ घेतला. शिबीरात स्त्रीरोग विभाग 71, अति जोखमीच्या माता 52, स्तनदा माता 19, बालरोग 49, नेत्ररोग 39, असंसर्गजन्य रोग 48, ईसीजी 19, मोतीबिंदू 9, शस्त्रक्रिया 7, हृदयरोग 2, मधुमेह 2, तसेच जिल्हास्तरावी तातडीची उपाययोजना करणे आवश्यक आहे अशा रूग्णांची तपासणी करण्यात आली. 52 रूग्णांची सोनोग्राफी करण्यात आली. यातील 24 रूग्णांना संदर्भित करण्यात आले आहे.
मेळघाटातील आदिवासींची सर्वकष आरोग्य तपासणी करण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून मेळघाट आरोग्य परिक्रमा अभियान राबविण्यात येत आहे. यात प्रत्येक आठवड्यात एक याप्रमाणे महिन्याला चार आरोग्य तपासणी शिबीरे आयोजित करण्यात येणार आहे. पुढील सात महिने आरोग्य शिबीर आयोजित करण्यात येणार आहे. तपासणी करून रूग्णांवर उपचार आणि आवश्यक औषधोपचारही मोफत करण्यात आले.
शिबीरात शल्यचिकित्सक डॉ. संजय पाठक, बालरोग तज्ज्ञ डॉ. विजयसिंग राजपुर, नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. आशिष धवळे, स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. स्नेहल शेट्टी, डॉ. राठी यांनी सेवा दिली. जिल्हाधिकारी आशिष येरेकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी संजिता महापात्र यांच्या संकल्पनेतून अभियान राबविण्यात येणार आहे.
शिबीरासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण पारिसे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. तिलोत्तमा वानखेडे, डॉ. वानखडे, डॉ. पिंपरकर आणि डॉ. जाकीर यांच्यासह गोडे वैद्यकीय महाविद्यालयातील तज्ज्ञ डॉक्टरांनी सहकार्य केले.




