मरणोत्तरही जग पाहण्यासाठी करा नेत्रदान- डॉ. अर्चना पाटील वरे
B1न्यूज मराठी नेटवर्क
छत्रपती संभाजीनगर, दि.२ : बुब्बुळामुळे येणारे अंधत्व दूर करण्यासाठी मरणोत्तर नेत्रदान करुन अंध व्यक्तीस बुब्बुळाचे प्रत्यारोपण करणे हा एकमेव मार्ग होय. अशाप्रकारे नेत्रदान करुन आपण दृष्टिचे दान करुन मरणोत्तर ही हे जग पाहू शकतो. त्यामुळे प्रत्येकाने नेत्रदानाचा संकल्प करावा,असे आवाहन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नेत्रविभागाच्या प्रमुख डॉ. अर्चना पाटील वरे यांनी केले.
नेत्रदान पंधरवड्यानिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात ‘नेत्रदान व नेत्राची घ्यावयाची काळजी’, याबाबत डॉ. अर्चना पाटील वरे यांचे व्याख्यान आयोजीत करण्यात आले. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी हे अध्यक्षस्थानी होते. निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी, उपजिल्हाधिकारी डॉ. सुचिता शिंदे, एकनाथ बंगाळे, उपविभागीय अधिकारी डॉ. व्यंकट राठोड, नेत्रतज्ज्ञ डॉ. शोभा झंवर आदी उपस्थित होते.
डॉ. अर्चना पाटील म्हणाल्या की, आपल्या देशात बुब्बुळामुळे आलेल्या अंधत्वाचे प्रमाण मोठे आहे. ह्यापैकी १टक्के लहान बालके असतात. दर वर्षी ३० हजार लोकांना नेत्रबुब्बुळांची गरज भासते. प्रत्यक्षात केवळ ३ हजार बुब्बुळेच प्राप्त होतात. त्यामुळे नेत्रदान विषयक जनजागृती होणे आवश्यक आहे. नेत्रदान कुणीही करु शकतो. मृत्यूनंतर ६ तासांच्या आत मृतदेहाचे डोळे काढण्याचे काम नोंदणीकृत वैद्यकीय अधिकारी करतात. त्यामुळे नेत्रदानासाठी आपले नाव नोंदवा. मृत्यूनंतर जवळच्या नेत्रपेढीशी आपल्या नातेवाईकांमार्फत संपर्क साधून नेत्रदान केले जाते,अशी माहिती डॉ. पाटील यांनी दिली.
नेत्रदानाविषयक जनजागृतीपर पथनाट्य यावेळी सादर करण्यात आले. प्रास्ताविक एकनाथ बंगाळे यांनी केले. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आपला मनोगतातून नेत्रदान संकल्प करण्याचे आवाहन उपस्थितांना केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी- कर्मचारी यावेळी उपस्थित होते.




