सोलापूर जिल्ह्यात गणेशोत्सव मिरवणुकीत डॉल्बी सिस्टिम आणि लेझर लाइट्सवर कडक बंदी
B1न्यूज मराठी नेटवर्क
सोलापूर : जिल्हादंडाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ (१) अंतर्गत जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, सोलापूर जिल्ह्यात २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर २०२५ या कालावधीत सार्वजनिक गणेश मंडळांच्या मिरवणुकीत डॉल्बी सिस्टिम आणि लेझर लाइट्सच्या वापरावर पूर्णत: बंदी घालण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल.
या बंदीमागील मुख्य कारणे म्हणजे मागील वर्षीच्या गणेश मूर्ती आगमन आणि विसर्जन मिरवणुकांमध्ये डॉल्बी सिस्टिममुळे अनेक भाविकांना कान आणि छातीचे त्रास जाणवले, ज्यामुळे काहींना कायमचे अपंगत्व किंवा जीविताला धोका निर्माण झाला. तसेच लेझर लाइट्समुळे डोळ्यांच्या पडद्याला आणि बुब्बळांना इजा होण्याच्या घटना घडल्या, विशेषत: ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना. ज्येष्ठ नागरिक संघटनांनी याबाबत निवेदने सादर केली असून, उपविभागीय अधिकारी सोलापूर क्रमांक १ यांनी २७ ऑगस्टच्या अहवालात या मुद्द्यावर भर दिला आहे.
जिल्हादंडाधिकारी यांनी अधिसूचनेत म्हटले आहे की, गणेशोत्सव हा पारंपरिक पद्धतीने आणि उत्साहाने साजरा केला जातो, पण डॉल्बी आणि लेझर लाइट्सच्या अतिरेकी वापरामुळे मानवी जीवित, आरोग्य आणि सुरक्षेला धोका आहे. त्यामुळे तात्काळ प्रतिबंधात्मक उपाय म्हणून हा आदेश जारी करण्यात आला. या कालावधीत मिरवणुकांमध्ये या सिस्टिम्सचा वापर पूर्णपणे प्रतिबंधित असून, याचे पालन सुनिश्चित करण्यासाठी पोलिस आयुक्त सोलापूर शहर, पोलिस अधीक्षक सोलापूर, उपविभागीय दंडाधिकारी, तहसीलदार आणि जिल्हा माहिती अधिकारी यांना सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्हा माहिती अधिकारी यांना ही अधिसूचना दैनिक वृत्तपत्रांत प्रसिद्ध करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
या निर्णयामुळे गणेशोत्सव अधिक सुरक्षित आणि पारंपरिक स्वरूपात साजरा होईल, अशी अपेक्षा आहे. मागील वर्षीच्या घटनांवरून शिकून घेतलेला हा पाऊल असून, नागरिकांना आरोग्यरक्षणासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.




