बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र; मराठा आरक्षणासाठी तातडीने न्यायाची मागणी
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : बार्शीचे आमदार अॅड. दिलीप सोपल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात तातडीने न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे. या पत्राद्वारे त्यांनी मराठा समाजाच्या दीर्घकाळापासून सुरू असलेल्या संघर्षावर प्रकाश टाकला असून, शासनाने या मुद्द्यावर सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी विनंती केली आहे.
पत्रात आमदार सोपल यांनी नमूद केले आहे की, मराठा समाजाला गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक न्याय आणि समान हक्कांसाठी आरक्षणाची गरज भासत आहे. या मागणीसाठी विविध नेते आणि संघटना न्यायालयीन लढा देत आहेत. विशेषतः मनोज दादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनाला संपूर्ण राज्यातून व्यापक पाठिंबा मिळत असून, हे आंदोलन समाजाच्या न्यायहक्कांसाठी महत्त्वपूर्ण ठरत आहे.
मराठा समाजातील लाखो कुटुंबांच्या सामाजिक आणि शैक्षणिक भवितव्याचा प्रश्न या आंदोलनाशी जोडलेला आहे. त्यामुळे या मुद्द्यावर तातडीने निर्णय घेणे अत्यावश्यक असून, शासनाने समाजाच्या न्याय मागणीला प्रतिसाद द्यावा. या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्यास समाजातील असंतोष वाढण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने आवश्यक ती कारवाई करून मराठा समाजाला न्याय मिळवून देतील, अशी आशा आमदार सोपल यांनी व्यक्त केली आहे.




