आमदार दिलीप सोपल यांनी एस.पी. अतुल कुलकर्णी यांचे मानले आभार : डीजे बंदी निर्णयाचे स्वागत
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : कर्णकर्कश डीजे बंदीबाबत सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी घेतलेल्या ठोस भूमिकेचे आमदार दिलीप सोपल यांनी अभिनंदन केले आहे. याबाबत आमदार सोपल यांनी पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयात जाऊन कर्णकर्कश डीजेचे दुष्परिणाम व त्यावरील उपाययोजना याबाबत चर्चा केली होती. त्यानंतर कुलकर्णी यांनी तत्काळ आदेश काढले.
अभिनंदन पत्रात आमदार सोपल यांनी म्हटले आहे की, “आपण दिलेला सकारात्मक प्रतिसाद आणि तात्काळ केलेली अंमलबजावणी याबद्दल मनःपूर्वक आभार. बार्शी तालुक्यातील चारही पोलीस ठाण्यांतर्गत या निर्णयाची अंमलबजावणी स्वागतार्ह आहे.” तसेच न्यायालयाच्या निर्णयानुसार डीजे बंदीबरोबरच कर्णकर्कश आवाजावरील बंदी व लेझर लाईट्स अपायकारक असल्याने त्यावरही योग्य उपाययोजना व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
याशिवाय जयंतीसह विविध उत्सव काळात गाव किंवा शहरात एकाच दिवशी मिरवणुकीचे आयोजन करण्यासाठी प्रयत्न व्हावेत, अशीही विनंती सोपल यांनी केली आहे. यामुळे रोजच्या मिरवणुकीमुळे होणारा वाहतुकीचा अडथळा, बाजारपेठा बंद होणे, तसेच विद्यार्थ्यांना, ज्येष्ठ नागरिकांना व रुग्णालय परिसराला होणारा त्रास टाळता येईल, असे त्यांनी म्हटले आहे.
डीजे बंदीप्रमाणेच लेझर लाईट्स आणि मिरवणुकीच्या वेळापत्रकाबाबतही योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली असून, या लोकाभिमुख व व्यापक लोकहिताच्या निर्णयासाठी त्यांनी पोलीस अधीक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.




