अतिवृष्टीग्रस्तांच्या नुकसानीचे शासनाने पंचनामे करून तातडीने मदत करावी – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
B1न्यूज मराठी नेटवर्क
मुंबई : अतिवृष्टीने मुंबईतील झोपडपट्ट्या वस्त्यांमध्ये आणि राज्यभरात झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीचे राज्यसरकारने त्वरित पंचनामे करून अतिवृष्टीग्रस्तांना नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केली आहे.
मुंबईत मुसळधार पाऊस सुरू असताना आज भरपावसात केंद्रिय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी मुंबईतील बांद्रा येथील वाल्मीकी नगर ; महाराष्ट्र नगर; खेरवाडी; खार; मिठी नदी परिसरातील वस्त्यांना ना. रामदास आठवले यांनी आज भेटी देऊन पाहणी केली.यावेळी खेरवाडी पोलिस स्टेशन च्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुप्रिया पाटील या उपस्थित होत्या.तसेच रिपब्लिकन पक्षाचे मुंबई प्रदेश अध्यक्ष सिद्धार्थ कासारे; अमित तांबे आदी मान्यवर उपस्थित होते.
खेरवाडी बीकेसी येथील वाल्मीकी नगर मधील वरदान आनंद झंझोटड हा तरुण येथील नाल्यात वाहून गेल्याची माहिती येथील वस्तीतील रहिवासियांनी दिली. तिथे ना. रामदास आठवले यांनी भेट दिली. वाहून गेलेला तरुणाचा शोध अद्याप लागलेला नाही. नाल्याशेजारीही वस्ती असून पावसात नाल्याचे पाणी घरांमध्ये शिरते. त्यामुळे नाल्या शेजारी राहणाऱ्या वाल्मिकी नगर महाराष्ट्र नगर झोपडिवासीयांच्या वस्त्यांच्या संरक्षणासाठी संरक्षक भिंत उभारण्याची सूचना आपण जिल्हा अधिकारी; महापालिका आणि प्रशासनाला करणार असल्याचे आश्वासन ना.रामदास आठवले यांनी दिले.
वाल्मिकीनगर मधील नाल्यात वाहून गेलेल्या तरुणाच्या कुटुंबाला राज्य शासनाने मदत करण्याची मागणी ना. रामदास आठवले यांनी केली आहे. अतिवृष्टीने मुंबईतील चाकरमान्यांचे मोठे हाल झाले आहेत. ग्रामीण भागात पीकपाणी वाहून गेले आहे.राज्य सरकार नदी जोड प्रकल्प उभारत आहे.तरीही मुंबई कोकण राज्यभरात होणाऱ्या अतिवृष्टीचे पाणी समुद्रात वाहून जाते ते पाणी धरणामध्ये वाळवावे; जिथे दुष्काळी भाग आहे अशा भागात अतिवृष्टीचे पाणी वाळवावे यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करावेत अशी मागणी ना.रामदास आठवले यांनी केली आहे.




