जिल्ह्यात अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणांनी सतर्क रहावे – जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

परभणी दि. 18 : प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी दिलेल्या सूचनेनुसार दिनांक 18 व 19 ऑगस्ट, 2025 या कालावधीत परभणी जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी केला आहे. त्यानुसार नमूद कालावधीत जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे.

त्याचप्रमाणे परभणी जिल्ह्यातील येलदरी व निम्न दुधना हे धरणे तसेच ढालेगाव, तारुगव्हान, मुदगल, दिग्रस हे उच्च पातळी बंधारे आणि झरी, करपरा, मासोळी, मुळी व पिंपळदरी हे निम्न पातळी व मध्यम प्रकल्प पुर्ण क्षमतेने भरले असल्यामुळे सदर धरणे, उच्च पातळी बंधारे, मध्यम प्रकल्प, साठवण तलाव इत्यादीमधून सद्यस्थितीत अतिरिक्त पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील गोदावरी, पुर्णा व दुधना आणि या नद्यांच्या उपनद्या, ओढे नाले इत्यादी तुडुंब भरून वाहत आहेत.

या नैसर्गिक आपत्ती संदर्भात सर्व संबंधित यंत्रणा आणि जनतेने खबरदारी घ्यावी. जिल्ह्यात गोदावरी नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहावे, नदी पात्रात कोणीही उतरु नये, वाहने, पशुधन इत्यादी सुरक्षित स्थळी ठेवावेत. नागरिकांनी सुरक्षित व सतर्क राहण्याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले आहे.

काय करावे : गावात पुरस्थिती निर्माण झाल्यास अथवा पुराबाबत पुर्व कल्पना मिळाल्यास घरातील उपयुक्त सामान, महत्तवाची कागदपत्रे, जनावरे सुरक्षित ठिकाणी हलवा, विजेवर चालणाऱ्या उपकरणांचा वीज पुरवठा बंद करावा. गावात अचानक पुरस्थिती निर्माण झाल्यास तात्काळ प्रशासनास कळवावे. गावात/घरात जंतुनाशक असतील तर ते पाण्यात विरघळणार नाहीत याची दक्षता घ्या. पुर परिस्थतीत उंच ठिकाणी जावे तसेच जाते वेळी सोबत रेडिओ, टॉर्च, सुके खाण्याचे पदार्थ, पिण्याचे पाणी सोबत ठेवावे, शक्य असल्यास घर सोडुन जाताना दारे, खिडक्या सर्व घट्ट बंद करुन जा. कुंटुंबातील सर्व व्यक्तीकडे ओळखपत्र न भिजता राहील याची काळजी घ्या. पुरामध्ये अडचणीत सापडला असाल तर आजुबाजुच्या साधनांचा वापर करा (उदा. पाण्यावर तरंगणारे मोठे लाकुड, प्लास्टिकचे ड्रम याचा वापर करा.) मदत आवश्यक असल्यास तात्काळ स्थानिक तहसील कार्यालयास किंवा जिल्हाधिकारी कार्यालय नियंत्रण कक्ष क्रं 02452-226400 किंवा 1077 या टोल फ्री क्रमाकावर संपर्क साधावा. आपले पशुधन व अन्य पाळीव प्राणी यांना बांधले असेल तर त्यांना खुले करुन सुरक्षित स्थळी हलवावे व स्वत: सुरक्षित स्थळाचा आसरा घ्यावा. सोबत रेडीओ, बॅटरी, मोबाईल संपर्काची साधने ठेवण्याचा प्रयत्न करावा. हे साहीत्य भिजणार नाही व सुरक्षित राहील याची योग्य खबरदारी घ्यावी.

काय करु नये : पुर असलेल्या भागात, नदीच्या पुलावर विनाकारण जावू नका. पुराच्या पाण्यात जावु नका, तसेच पुर ओसरल्यानंतर प्रशासनाने परवानगी दिल्याशिवाय पुलावरुन गाडी घालण्याचा, अथवा पुल ओलांडण्याचा प्रयत्न करु नका. दुषित/उघड्यावरील अन्न व पाणी टाळा (शक्यतो उकळलेले पाणी, सुरक्षित अन्न सेवन करा.) सुरक्षित ठिकाणी रहा व विद्युत तारांना स्पर्श करु नका. पोहता येत असेल तरच बुडणा-या व्यक्तींना वाचवा परंतु अपरिचीत व खोल पाण्यात जाऊ नका. जलसाठ्याजवळ नदीजवळ जाऊ नये, आपल्या मुलांना जलसाठ्यावर/नदीवर पोहण्यासाठी पाठवु नये. मच्छिमार व अन्य व्यक्तींनी पाण्यामध्ये जाऊ नये.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या