धुळे आणि नंदूरबार जिल्ह्यातील रेल्वे सुविधांच्या विकासासंदर्भात मंत्री जयकुमार रावल यांचे केंद्रीय रेल्वेमंत्री यांना निवेदन

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

नवी दिल्ली, 07 : धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्याने विपणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी आज केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील रेल्वे सुविधांच्या विकासासाठी महत्वपूर्ण मागण्याचे निवेदन दिले.

या निवेदनात दोंडाईचा स्थानकावर सुपरफास्ट गाड्यांचा थांबा, दादर-भुसावळ विशेष गाडी नियमित करणे, नवीन भुसावळ-पुणे रेल्वे सेवा, प्लॅटफॉर्म सुविधांचा विकास, अमृत भारत स्टेशन योजनेची अंमलबजावणी आणि रेल्वे डब्यांचे अपग्रेडेशन यासारख्या मागण्यांचा समावेश आहे.

मंत्री रावल यांनी दोंडाईचा शहराचे औद्योगिक, कृषी आणि पर्यटन क्षेत्रातील महत्त्व अधोरेखित करत सुपरफास्ट गाड्यांना दोंडाईचा स्थानकावर थांबा देण्याची मागणी केली. नाशिक आणि मध्य प्रदेशाला जोडणारा महामार्ग आणि जवळील तोरणमाळ, बाल्साना तीर्थक्षेत्रामुळे या शहराला विशेष महत्त्व आहे. सध्या सुपरफास्ट गाड्या थांबत नसल्याने प्रवाशांची गैरसोय होते. तसेच, 2023 मध्ये सुरू झालेली दादर-भुसावळ विशेष गाडी (09051/52, 09049/50) नियमित करावी, तिचे भाडे कमी करावे आणि एल एच बी ( LHB) कोच वापरावे, अशी विनंती रावल यांनी यावेळी केली.

दोंडाईचा स्थानकावरील प्लॅटफॉर्म 6 वर कव्हर्स्ड नसल्याने सामानाचे नुकसान होते आणि रेल्वे रॅक रिकामे करण्याच्या अनिश्चित वेळेमुळे विलंब शुल्क आकारले जाते. रावल यांनी कव्हर्स्ड बांधणे, नऊ तासांची मर्यादा सकाळी 8 वाजता सुरू करणे आणि पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे यासारख्या सुविधा पुरवण्याची मागणी केली. याशिवाय, पश्चिम खानदेशातून पुण्याला थेट रेल्वे सेवा नसल्याने भुसावळ-अमळनेर-शिंदखेडा-दोंडाईचा-पुणे अशी नवीन सेवा सुरू करण्याची विनंती केली.

अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत शिंदखेडा, दोंडाईचा आणि नरडाणा स्थानकांचा समावेश करावा, तसेच काही गाड्यांचे अर्धे फर्स्ट एसी आणि सेकंड एसी कोच पूर्ण फर्स्ट एसी कोचमध्ये अपग्रेड करावे, अशी मागणीही रावल यांनी केली.

खानदेशातील प्रवाशांच्या सोयी आणि स्थानिक विकासाला चालना देण्यासाठी केलेल्या मागण्यांवर रेल्वेमंत्री सकारात्मक निर्णय घेतील असा विश्वास रावल यांनी व्यक्त केला.

यासह, रावल यांनी आज केंद्रीय आयुष मंत्री (स्वतंत्र प्रभार) प्रतापराव जाधव आणि केंद्रीय माहिती व प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी विविध विषयांवर चर्चा केली.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या