जिल्हा प्रशासनाला “मिशन आशीर्वाद” साठी राष्ट्रीय पुरस्कार केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते नवी दिल्लीत गौरव
B1न्यूज मराठी नेटवर्क
वाशिम, दि. ७ ऑगस्ट : जिल्हा प्रशासनाने सेंद्रिय शेतीच्या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत “मिशन आशीर्वाद” या उपक्रमासाठी “सेंद्रिय शेती उत्कृष्टता पुरस्कार” हा मानाचा राष्ट्रीय सन्मान प्राप्त केला आहे. हा पुरस्कार दुसरी शाश्वत शेती परिषद आणि पुरस्कार २०२५ या राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमात नवी दिल्ली येथे प्रदान करण्यात आला.
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते जिल्ह्याच्या वतीने उपविभागीय कृषी अधिकारी संतोष वाळके यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या “मिशन आशीर्वाद” या उपक्रमामुळे वाशिम जिल्ह्याच्या सेंद्रिय शेती क्षेत्रातील कामगिरीला राष्ट्रीय मान्यता मिळाली आहे. या यशामध्ये जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरिफ शाह आणि प्रकल्प संचालक आत्मा अनिसा महाबळे यांचा मोलाचा सहभाग आहे.
शाश्वतता महत्त्वाची आहे, इंडीअॅग्री, आणि ग्रेमॅटर्स या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने या पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते.
“मिशन आशीर्वाद” उपक्रमाअंतर्गत वाशिम जिल्ह्यात सेंद्रिय शेती नवोपक्रम, बाजारपेठेची सशक्त जोडणी, आणि शाश्वत उत्पादन प्रणाली या घटकांमध्ये केलेल्या कार्यामुळे हा पुरस्कार प्राप्त झाला. या कार्यामुळे जिल्ह्याचा सेंद्रिय शेती आदर्श राष्ट्रीय पातळीवर उभा राहिला आहे.
कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केले की, हा पुरस्कार जिल्ह्यातील सेंद्रिय शेतीला नवी दिशा देणारा ठरेल आणि शेतकऱ्यांमध्ये सेंद्रिय शेतीबाबत जागृती व आत्मविश्वास निर्माण करेल.




