जन धन खातेधारकांसाठी री-केवायसी’ आणि जनसुरक्षा योजनांची अंमलबजावणी साठी बँक आपल्या गावात
B1न्यूज मराठी नेटवर्क
रायगड : जिल्ह्यातील सर्व बँक खातेधारकांनी आपल्या जन धन खात्यांचे ‘री-केवायसी’ (Re-KYC) आणि केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री जनसुरक्षा योजनांची नोंदणी करण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर आयोजित शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अग्रणी प्रबंधक श्री. विजय कुलकर्णी यांनी केले आहे.
हे अभियान भारत सरकारचे वित्त मंत्रालय आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांच्या निर्देशानुसार १ जुलै ते ३० सप्टेंबर २०२५ या कालावधीत सुरू आहे.
रायगड जिल्ह्यात या अभियानाची सुरुवात ३ जुलै २०२५ रोजी जिल्हाधिकारी किशन जावळे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नेहा भोसले यांच्या उपस्थितीत झाली.
शिबिरात उपलब्ध सुविधा
जिल्ह्यातील सर्व बँकांकडून वेगवेगळ्या ग्रामपंचायतींमध्ये शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरांमध्ये बँक ग्राहक खालील सेवांचा लाभ घेऊ शकतील:
जन धन खात्यांचे ‘री-केवायसी’ (Re-KYC): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीने सुरू झालेल्या जन धन योजनेच्या खात्यांना दहा वर्षे पूर्ण झाल्यामुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमानुसार ‘री-केवायसी’ करणे अत्यावश्यक आहे. या शिबिरात हे काम केले जाईल.
प्रधानमंत्री जनसुरक्षा योजनांची नोंदणी:
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, आणि अटल पेन्शन योजना यांसारख्या महत्त्वाच्या योजनांसाठी नवीन नोंदणी करणे.
विशेष मेळाव्याचे आयोजन
या अभियानाअंतर्गत शुक्रवार, ८ ऑगस्ट २०२५ रोजी बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रजनीश कर्नाटक यांच्या प्रमुख उपस्थितीत सेंट्रल स्कूल, आमटेम येथे एका विशेष मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सदर मेळावा यशस्वी करण्यासाठी साकव प्रकल्प संस्था पेण मदत करणार असुन त्यांच्या माध्यमातून पाबळ खोरे मधील कोंढवा, वरप, जिर्णे मधील आदिवासी लोकांची जनधन खाती तसेच त्यांना सामाजिक सुरक्षा योजनेमध्ये सामावून घेतले जाणार आहे यासाठी नागोठणे आमटेम पाबळ खोरे आणि पेण तालुक्यातील सर्व लोकांनी तसेच बँक ऑफ इंडियाच्या सर्व ग्राहकांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन कुलकर्णी यांनी केले आहे.
गावांमध्ये शिबिरे कधी होणार आहेत याची माहिती जवळच्या बँक शाखेत आणि ग्रामपंचायत कार्यालयात मिळू शकेल, असेही त्यांनी सांगितले.




