प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी मुदतवाढ
B1न्यूज मराठी नेटवर्क
पुणे : प्रधानमंत्री पीक विमा सुधारित योजनेत सहभागी होण्यासाठी बिगर कर्जदार शेतकऱ्यांना १४ ऑगस्ट व कर्जदार शेतकऱ्यांना ३० ऑगस्ट २०२५ पर्यंत विशेष बाब म्हणून मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती विभागीय कृषी सहसंचालक दत्तात्रय गावसाने यांनी कळविली आहे.
चालू खरीप हंगामामध्ये सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना राज्यातील सर्व जिल्ह्यात महाराष्ट्र शासनामार्फत राबविण्यात येत आहे. तांत्रिक व्यत्ययामुळे शेतकऱ्यांच्या योजनेतील सहभागावर होणारा परिणाम लक्षात घेऊन केंद्र शासनाच्या निर्देशानुसार ही मुदतवाढ देण्यात आली आहे. विभागातील सर्व शेतकऱ्यांनी https://www.pmfby.gov.in या पोर्टलवर स्वत: अथवा बँक विमा कंपनीने नियुक्त केलेले प्रतिनिधी, क्रॉप इन्शुरन्स ॲप व सामूहिक सेवा केंद्र यांच्यामार्फत योजनेत सहभागाची नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी आपल्या संबंधित पीक विमा कंपनीचे कार्यालय, तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयांशी संपर्क साधावा, असे आवाहन गावसाने यांनी केले आहे.




