बार्शीमहाराष्ट्र

“मराठा आरक्षणाच्या निर्णायक लढ्यासाठी तडवळे गाव सज्ज; २९ ऑगस्ट रोजी मुंबईच्या लढ्यात बार्शी तालुक्यातून भक्कम सहभाग”

B1न्यूज मराठी नेटवर्क

वैराग : मराठा समाजाला सगेसोयर्‍यासह कायद्याद्वारे सरसकट ओबीसी आरक्षण मिळावे, या प्रमुख मागणीसाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील २९ ऑगस्ट रोजी मुंबईत आमरण उपोषणास बसणार आहेत. या निर्णायक लढ्याला बार्शी तालुक्यातील तडवळे गावातून मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव सहभागी होणार असून, संपूर्ण तालुक्यात गावोगाव घोंगडी बैठकींच्या माध्यमातून जोरदार तयारी सुरू आहे.

तडवळे गावाची पुन्हा एकदा इतिहासात नोंद

तडवळे हे गाव मराठा आरक्षणाच्या लढ्याच्या प्रत्येक टप्प्यावर अग्रेसर राहिले आहे. यापूर्वी झालेल्या कॅंडल मार्च, धरणे आंदोलन, प्रतिमा दहन, निषेध मोर्चा, यज्ञ अशा विविध उपक्रमांमध्ये गावाने सक्रीय सहभाग नोंदवला. विशेषतः राज्यात दखल घेतले गेलेल्या ऐतिहासिक ट्रॅक्टर मोर्चात सर्वाधिक ट्रॅक्टर तडवळे गावातीलच होते, याची नोंद आजही ठेवली जाते.

घोंगडी बैठक – निर्धार आणि एकजुटीचे प्रतीक

तडवळे येथे पार पडलेल्या घोंगडी बैठकीत मराठा समाजाने ठाम निर्धार व्यक्त केला की, “आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत मागे हटायचे नाही!” बैठकीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. पूजन करताना डॉ. कपिल कोरके, आनंद काशीद, युवराज काटे, तसेच घोडके मामा उपस्थित होते.

नेत्यांचे स्पष्ट संदेश

मा. सरपंच अमर लोखंडे म्हणाले, “गेल्यावेळीही आम्ही लढलो, यावेळीही लढू. संख्येने मोठा सहभाग देऊन मुंबईत हजेरी लावू.”

आनंद काशीद यांनी म्हटले, “हा लढा आता रस्त्यापुरता राहिलेला नाही, तो प्रत्येक मराठ्याच्या घराघरात पोहोचला आहे. समाजाची ताकद पुन्हा एकदा दाखवायची वेळ आली आहे.”

डॉ. कपिल कोरके (जगदंबा शैक्षणिक परिवार) म्हणाले, “हा समाजाच्या अस्तित्वाचा शेवटचा निर्णायक लढा आहे. यश मिळवण्यासाठी सर्व मराठ्यांनी एकदिलाने उभे राहावे.”

मा. सभापती युवराज बापू पाटील (पंचायत समिती, बार्शी) यांनी भावनिक आवाहन करत सांगितले, “आपल्या पुढच्या पिढ्यांच्या भवितव्यासाठी संघर्ष योद्धा जरांगे पाटलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा.”

घोडके मामा म्हणाले, “हा लढा श्रीमंत नव्हे तर गोरगरिब मराठ्यांनी उभा केला आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून या लढ्यात सक्रिय सहभाग द्यावा.”

कार्यक्रमाचे आयोजन आणि सहकार्य

या बैठकीचे सूत्रसंचालन बाळासाहेब आवारे यांनी केले तर आभार प्रदर्शन मा. सरपंच अमरसिंह लोखंडे यांनी मानले. बैठकीच्या यशस्वी आयोजनासाठी तडवळे गावातील अनेक समाजबांधवांनी परिश्रम घेतले. बैठकीस गावातील मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव उपस्थित होते.

२९ ऑगस्ट : लढ्याचा निर्णायक दिवस

मुंबईमध्ये होणाऱ्या निर्णायक लढ्यासाठी तडवळे गावातून शेकडो मराठा बांधव उपस्थित राहणार आहेत. या लढ्याला केवळ आरक्षणाचा उद्देश नाही, तर मराठा समाजाच्या स्वाभिमानाचे पुनर्स्थापन करण्याचा प्रयत्न आहे. संघर्षाचा आवाज आता शिगेला पोहचला आहे, आणि या आवाजात तडवळे गावाचे योगदान पुन्हा एकदा उठून दिसत आहे.

“आरक्षण मिळेपर्यंत लढा थांबणार नाही, हीच प्रतिज्ञा… आणि २९ ऑगस्ट हा विजयाचा पहिला टप्पा ठरणार!”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button