महामंडळाचे अध्यक्ष ललीत गांधी यांनी घेतला अल्पसंख्याक विकास योजनांचा आढावा
निबंध स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन
B1न्यूज मराठी नेटवर्क
यवतमाळ : जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष तथा राज्य अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य ललीत गांधी यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात अल्पसंख्याक विकास योजनांचा आढावा घेतला.
या बैठकीला प्र.जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, उपजिल्हाधिकारी जयराम देशपांडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रांजल शिंदे, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात , जिल्हा नियोजन अधिकारी विजय वाघमारे, तहसिलदार योगेश देशमुख यांच्यासह जिल्हा प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.
या आढावा बैठकीत अध्यक्ष ललीत गांधी यांनी जिल्ह्यातील अल्पसंख्यांक लोकसंख्या, जैन समाजाच्या शाळा, अल्पसंख्याक बहुल शासनमान्य खासगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, विना अनुदानित शाळा, अपंग शाळांमध्ये पायाभूत सुविधा, निधी वितरण, मदरसांना अनुदान, नागरी व ग्रामीण क्षेत्रविकास कार्यक्रमाची सद्यस्थिती व निधी वाटप, निवासी पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण योजना, प्रधानमंत्री जनविकास कार्यक्रम, धर्मक्षेत्र विकास कार्यक्रम, सूक्ष्म व लघु उद्योगांसाठी कर्ज वितरण आणि उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी वसतिगृहाबाबत सविस्तर आढावा घेतला.
निबंध स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार
भगवान महाविर स्वामी २५५० वा निर्वाण कल्याणक महोत्सव समितीच्या वतीने आयोजित निबंध स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार महामंडळाचे अध्यक्ष तथा राज्य अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य ललीत गांधी यांच्या हस्ते करण्यात आला.
जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन शहरातील दारव्हा रोडवरील सुयोग नगर येथे नव्याने सुरु करण्यात आलेल्या जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन अध्यक्ष ललीत गांधी यांच्या हस्ते करण्यात आले.




