सार्वजनिक शौचालयाकडे जाणारा पूल पडला, महिन्यानंतरही ‘जैसे थेच’
B1न्युज मराठी नेटवर्क
बार्शी – शहरातील सनगर गल्ली या भागात असणारे बार्शी नगरपालिकेच्या सार्वजनिक शौचालयाकडे जाणारा पूल काही दिवसांपूर्वी पडला होता. या पुलावरून जेसीबीची वाहतूक होत असताना तो पूल तुटला. त्यानंतर, नगरपालिका कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मात्र, जवळपास 1 महिन्यानंतरही, अद्यापही या पुलाचे काम करण्यात आले आहे. त्यामुळे, शौचास येणाऱ्या नागरिकांना, माता-भगिनींना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.नगरपालिकेच्या 17 नंबर शाळेजवळ गेल्या कित्येक दशकांपासून सार्वजनिक शौचालय अस्तित्वात आहे. येथे जुनी सनगर गल्ली, सनगर गल्ली, आझाद चौक, लहुजी चौक, टिळक चौक या भागातील नागरिक शौचालयासाठी येतात. पहाटे, तर कधी रात्री-अपरात्रीही यावे लागते. मात्र, सद्यस्थितीत येथील पूल पडला असल्याने नागरिकांना येण्या-जाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. तर, काहीवेळा तळावरच्या भरावरुन पायपीट करत शौचालयाचा वापर करावा लागत आहे. त्यामुळे, या पुलावरुन शौचालयाकडे जाणाऱ्या वयोवृद्ध महिलांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे.दरम्यान, नगरपालिका प्रशासनाला वारंवार सांगूनही येथील पुलाचे काम पूर्ण न झाल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. तसेच, लवकरात लवकर पूलाची दुरूस्ती करून हा पूल सुरू करावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.