विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना समृद्ध करण्याचा प्रयत्न – पालकमंत्री संजय राठोड

0

जिल्हास्तरीय कृषी महोत्सव व प्रदर्शनीचे उद्घाटन , महोत्सवात कृषी विज्ञान, तंत्रज्ञानाची 250 दालने

B1न्यूज मराठी नेटवर्क

यवतमाळ, दि.६ : शेतकऱ्यांसाठी शासनाच्यावतीने विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येतात. मी ज्या खात्याचा मंत्री आहे, त्या मृद व जलसंधारण विभागाच्यावतीने देखील जलयुक्त शिवार, गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार अशा योजना राबविण्यात येतात. या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना समृद्ध करण्याचा प्रयत्न असल्याचे प्रतिसाद पालकमंत्री संजय राठोड यांनी केले.

येथील समता मैदानात आयोजित पाच दिवशीय कृषि महोत्सव व प्रदर्शनीचे उद्घाटन पालकमंत्र्यांच्याहस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास अप्पर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष डाबरे, सहयोगी अधिष्ठाता विजय माने, अंजली गहरवाल, सहयोगी संशोधन संचालक आशुतोष लाटकर, जीवन पाटील, पराग पिंगळे, वरिष्ठ शास्त्रज्ञ मयूर ढोले, एमएआयडीसीचे विभागीय व्यवस्थापक सत्यजित ठोसरे, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॅा.नंदकिशोर हिरवे, उपसंचालक तेजस चव्हाण आदी उपस्थित होते.

सुरुवातीस पालकमंत्र्यांनी महोत्सवात लावण्यात आलेल्या दालनांचे फित कापून उद्घाटन केले. त्यानंतर विविध दालनांना भेटी देऊन पाहणी केली. मी देखील शेतकरी आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या कार्यक्रमात उपस्थित राहतांना मला आनंद होतो. येत्या काळात जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी बारामती येथे ज्या पद्धतीने कृषि प्रदर्शन भरविण्यात येते, तसे प्रदर्शन घेण्याचा प्रयत्न आहे, असे पुढे बालतांना पालकमंत्री राठोड म्हणाले.

शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी पाणी, वीज, उत्तम दर्जाचे बियाने व चांगले मार्गदर्शन आवश्यक आहे. त्यांना या गोष्टी मिळाल्या की ते स्वत:च आर्थिक समृध्दीकडे वाटचाल करतील. त्यामुळे यासाठी शासन सातत्याने आणि प्राधान्याने काम करत आहे. मृद व जनसंधारण विभाग शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. जिल्ह्यातील 600 हेक्टरच्या खालील सर्व तलावांमधून शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहोचविण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी कालव्यांऐवजी पाईपलाईनद्वारे पाणी देण्याचा नवीन प्रयोग आपण जिल्ह्यात राबवत आहोत. यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यात एक हजार कोटींची जलसंधारणाची कामे केली जात असल्याचे पालकमंत्री म्हणाले.

शेतकऱ्यांना दिवसा देखील सिंचनासाठी वीज उपलब्ध झाली पाहिजे. यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करत आहोत. कृषि महोत्सवाच्या माध्यमातून कृषि तंत्रज्ञान आणि माहितीचे आदान प्रदान होते. हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांनी आत्मसात केले पाहिजे. आपल्या शेतात अधिक उत्पन्न घेण्यासाठी काय केले पाहिजे, याची माहिती देखील या महोत्सवातून शेतकऱ्यांनी घेऊन शेतात नवीन प्रयोग करावे, असे आवाहन देखील पालकमंत्री राठोड यांनी यावेळी केली.

अप्पर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे यांनी आपल्या मनोगतात शेतकऱ्यांनी प्रदर्शनीचा लाभ घ्यावा. तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन वाढवावे, असे सांगितले. प्रास्ताविक श्री.डाबरे यांनी केले. महोत्सवात कृषिवियक तंत्रज्ञान, शासकीय योजना, बि-बियाणे, गृहोपयोगी वस्तू, बचतगटांचे 6 डोममध्ये 250 स्टाँल लावण्यात आले आहे. सायंकाळच्या सत्रात सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी पालकमंत्र्यांच्याहस्ते प्रयोगशिल व प्रगतीशिल शेतकरी महेश्वर बिचेवार, विठ्ठल मालेकर, दीपक जयस्वाल, रमेश वाटगुरे, अंकुश लेंडे, चंदाबाई घोडाम, गोपाळ बोबडे, एन.टी.जाधव, राजेश गुज्जलवार, रवींद्र वैद्य, ज्योती चव्हाण, संदीप म्हस्के, उल्हास गायकवाड, विलास रावते, महादेव चिडे, सुधाकर तोटावार, विनाताई कुडमेथे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचलन यांनी चंद्रबोधी घायवटे केले तर आभार तेजस चव्हाण यांनी मानले. कार्यक्रमास शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर महोत्सव दि.10 मार्च पर्यंत सुरु राहणार असून नागरिकांनी भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या