जिल्हा ग्रंथालय कार्यालयात ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन व सामूहिक वाचन

B1न्यूज मराठी नेटवर्क
यवतमाळ, दि.6 : वाचन संकल्प महाराष्ट्राचा पंधरवाडा अंतर्गत जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात ग्रंथ प्रदर्शनी व सामूहिक वाचन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दि.१५ जानेवारी पर्यंत पंधरवडा विविध कार्यक्रमाने साजरा केला जात आहे.
प्रदर्शनाचे उद्घाटन माध्यमिक शिक्षणच्या विस्तार अधिकारी स्मिता घावडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कविता महाजन व मान्यवर उपस्थित होते. यावेळी श्रीमती घावडे म्हणाल्या, ध्येय साध्य करावयाचे असल्यास प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवायला हवे. विद्यार्थ्यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा. अधिकतम वेळ पुस्तकांच्या सानिध्यात व्यतीत केला पाहिजे. अभ्यासक्रमाव्यतिरिक्त साहित्याचे वाचन आवर्जून केले पाहिजे. त्यातून जीवनाकडे पाहण्याची नवीन दृष्टी मिळते.
वाचन संस्कृतीच्या विकासाने तरुणांच्या व्यक्तिमत्त्वाचे भरणपोषण व सामाजिक प्रबोधन होण्यास मदत होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी वाचन पंधरवडा अंतर्गत साजरा होणाऱ्या विविध कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे त्या म्हणाल्या. जिल्हा ग्रंथालय अधिकारी कविता महाजन यांनी प्रास्ताविकांमध्ये उपक्रमाचा हेतू विशद केला. या उपक्रमातंर्गत आयोजित ग्रंथ प्रदर्शन १५ जानेवारीपर्यंत विद्यार्थी व नागरिकांसाठी विनामूल्य खुले असणार आहे.
उपक्रमांतर्गत दिनांक १५ जानेवारी पर्यंत सामूहिक वाचन, वाचन कौशल्य कार्यशाळा, वाचक व लेखक संवाद, पुस्तक परीक्षण व कथन स्पर्धा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची ग्रंथालयास भेट आदी कार्यक्रम जिल्ह्यातील ३१६ शासनमान्य ग्रंथालयात घेतले जात असल्याचे श्रीमती महाजन यांनी सांगितले. उद्घाटनप्रसंगी उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी एक तासाचा सामूहिक वाचनाचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमास स्पर्धा परीक्षार्थी व वाचक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.