सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ , राष्ट्र प्रेमाची भावना मनात ठेवून ध्वजदिन

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

निधी संकलनात अमुल्य योगदान द्यावे : जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ

जालना, दि. 9 : भारत देशाच्या संरक्षणासाठी आपले वीर सैनिक देशाच्या सिमेवर कोणत्याही वातावरणात आपली सेवा निष्ठेने बजावत असतात. सैनिक अत्यंत कठीण वातावरणासह परिस्थितीला सामोरे जावून देशाच्या सिमेचे दिवसरात्र संरक्षण करत असतात. तरी सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अधिकाऱ्यांसह नागरिकांनी राष्ट्र प्रेमाची भावना मनात ठेवून ध्वजदिन निधी संकलनात आपले अमुल्य योगदान द्यावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले.

सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ जालना येथील सैनिकी लॉन्सवर पार पडला. यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी महापालिका उपायुक्‍त नंदा गायकवाड, सेवानिवृत्त स्क्वॉड्रन लिडर तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी डॉ.रुपाली सरोदे, जिल्हा उद्योग केंद्र व्यवस्थापक योगेश सारणीकर, शिक्षणाधिकारी मंगल धुपे यांची प्रमुख उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी डॉ.पांचाळ म्हणाले की, आपले सैनिक सिमेवर खडा पहारा देत असल्याने आपण देशांतर्गत निर्भय जीवन जगत असतो. लोकशाहीचे मुल्य अबाधित ठेवण्यास तसेच देशाच्या प्रगतीत सैनिकांचा मोलाचा वाटा आहे. जो देश आर्मी व मिल्ट्रीचा चुकीचा अवलंब करतो तो देश कधीही प्रगती करु शकत नाही. नवीन पिढीला सैनिकांच्या भावना समजण्यासाठी शाळेतील विविध कार्यक्रमात एखादा भाग सैनिकांवर आधारित ठेवण्यात यावा. नागरिकांनी सार्वजनिक जीवनात सैनिक, माजी सैनिकांसह वीर माता, वीर पिता, वीर पत्नी यांचा नेहमी आदर करावा. असे सांगुन सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचे गेल्या वर्षी दिले गेलेले उद्दीष्ट सर्व कार्यालय प्रमुखांनी पुर्ण केले त्याबद्दल अभिनंदन करत चालु वर्षाची उद्दीष्टपूर्ती करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

सशस्त्र सेना ध्वजदिन निधीचा सैनिकांच्या कल्याणकारी योजनांसाठी वापरण्यात येत असतो. जालना जिल्ह्याला सशस्त्र सेना ध्वजदिन निधीचे दिले गेलेले उद्दीष्ट 221 टक्के पुर्ण केले आहे. सर्वांनी सैनिकांच्या व त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणासाठी सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनास मदत करावी. असे सांगून सशस्त्र सेना ध्वजदिन निधीचे महत्व प्रास्ताविकातुन सेवानिवृत्त स्क्वॉड्रन लिडर तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी डॉ. रुपाली सरोदे यांनी समजावुन सांगितले.

कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने व शहिदांना आदरांजली अर्पण करुन करण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गोविंद इंगोले यांनी करुन आभार मानले. पार्थ सैनिकी शाळेतील विद्यार्थ्यांनी “हम सब भारतीय है..!” हे संगीतबध्द गीत सादर केले. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या माजी सैनिकांच्या पाल्यांचा मान्यवरांच्या हस्ते यथोचित सन्मान करण्यात आला. तसेच मागील वर्षी उत्कृष्ट निधी संकलन केलेल्या कार्यालय प्रमुखांचा गौरवही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमास माजी सैनिकांसह वीर माता, वीर पिता, वीर पत्नी, एनसीसी, पार्थ सैनिकी शाळेतील विद्यार्थी, नागरिक, विविध कार्यालयाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या