राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत भांबेड प्राथमिक आरोग्य केंद्राचे भूमिपूजन , प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये दुपारची ओपीडी सुरु ठेवा : पालकमंत्री उदय सामंत

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

रत्नागिरी, दि. 6 : जशी सकाळची ओपीडी सुरु असते, तसेच ४ ते ६ या दुपारच्या सत्रामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ओपीडी सुरु ठेवावी. जेणेकरुन महिला भगिनींसाठी आरोग्याची सोय उपलब्ध होईल, अशी सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी आज केली.

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत लांजा तालुक्यातील भांबेड येथे प्राथमिक आरोग्य केंद्राचे भूमिपूजन कुदळ मारुन आणि कोनशिला अनावरण करुन, पालकमंत्री श्री. सामंत यांच्या हस्ते आज करण्यात आले. याप्रसंगी सिंधुरत्न समृध्द योजनेचे विशेष निमंत्रित सदस्य किरण सामंत, जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुध्द आठल्ये, गट विकास अधिकारी संतोष म्हेत्रे, सरंपच विनिता गांगण, तहसिलदार प्रियांका ढोले, तालुका वैद्यकीय अधिकारी प्रशांत परगे, वैद्यकीय अधिकारी उमा त्रिभुवने, राहूल पंडीत, गुरुप्रसाद देसाई, राजू कुरुप, वकील सदानंद गांगण आदी उपस्थित होते.

पालकमंत्री सामंत म्हणाले, ६ कोटी २२ लाख रुपये खर्चून प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत होणार आहे. एका वर्षामध्ये या इमारतीचे बांधकाम पूर्ण होईल. लोकप्रतिनिधींची मानसिकता असेल तर, कायापालट कसा होऊ शकतो, हे पाहू शकता. भांबेड सारख्या ठिकाणी पीएचसी होण्यासाठी इतकी वर्षे का लागली याचा विचार व्हायला हवा. दोन्ही महामार्गाचे मध्यठिकाण असणाऱ्या भांबेड पीएचसीला प्राधान्य दिले आहे. इथल्या ग्रामस्थांना सर्व सुविधा आणि आरोग्यासाठी चांगली सोय असेल. डॉक्टारांनी देखील २४ तास सेवा दिली पाहिजे. राज्यातील चांगली इमारत म्हणून या पीएचसीची इमारता बनवावी. जैतापूरलाही दुसरे प्राथमिक आरोग्य केंद्र बांधण्यात येत आहे. धरणांच्या कामालाही पैसे मिळाले आहेत. या पीएचसीच्या माध्यमातून नागरी सुविधेची चांगली सोय झाली असली तरी, ग्रामस्थांना डॉक्टरांकडे वारंवार जाता कामा लागू नये. त्यांचे आरोग्य चांगले रहावे आणि त्यांना आयुष्य लाभावे, अशा शुभेच्छाही पालकमंत्र्यांनी दिल्या.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज आणि धन्वंतरी मूर्तीचे पुजन करण्यात आले. तसेच दीप प्रज्ज्वलनही करण्यात आले. कार्यक्रमासाठी परिसरातील ग्रामस्थ विशेषत: महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या