आजच्या तरुणांना आत्मचिंतनाची गरज आहे – डोईफोडे
B1न्यूज मराठी नेटवर्क
वैराग : दररोज सभोवती घडणार्या घटनांच्या बातम्या कानावर पडतात तेव्हा समाजस्वास्थ हरपतंय याची प्रकर्षाने जाणीव होत असल्याचे शिवव्याख्याते खंडोजी डोईफोडे यांनी सांगितले.धामणगाव ता बार्शी येथे एक गाव एक गणपती या उपक्रमांतर्गत व्याख्यानमालेत ते बोलत होते.
छत्रपती शिवाजी महाराज शिकण्यासोबतच जगण्याचा विषय असून शिवरायांनी तोडण्याचा नव्हे तर जोडण्याचा इतिहास जगासाठी उपलब्ध करुन दिला आहे. प्रत्येक जातीतील महापुरुष आम्हाला आपला वाटला पाहिजे असे ते म्हणाले. समाजमाध्यमे आणि करमणुकीच्या विविध साधनातून चुकीच्या संस्काराचा मारा केला जातो. त्यापासून दूर राहण्याची गरज आहे. आपल्या मातीतील कष्ट आणि निष्ठेचे संस्कारा सोबतीला असतील तर आयुष्यात सुख समृद्धी येईल. आमच्या समोर महाराष्ट्रातील थोर मोठ्या महापुरुषांच्या आदर्शाची उपलब्धता असताना आपण मात्र चुकीचे आदर्श निवडतो.त्यामुळे तरुणांना आत्मचिंतन करण्याचे आवाहन डोईफोडे यांनी यावेळी केले.
दरम्यान वैराग पोलीस स्टेशनचे अधिकारी पो.नि.निवृत्ती मोरे यांच्या एक गाव एक गणपती संकल्पनेला गावातील विविध गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. या व्याख्यानासाठी वंशपिठाधीश विवेकानंद बोधले,उपसरपंच पंकज देशमुख, पोलिस पाटील गणेश मसाळ, वैभव देशमुख, मयुर लुंगसे, हनुमंत ढेकणे, प्रशांत देशमुख, भिमसेन आलाट, पंकज पाटील, सुहास सुरवसे याशिवाय गावातील विविध मंडळाचे सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.