निष्पक्ष व भयमुक्त वातावरणात निवडणुका पार पाडण्यात नोकरशाहीची भूमिका महत्त्वाची : मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम

0

लोकसभा निवडणुक 2024 पार पाडण्यासाठी झालेला खर्च 14 ऑगस्टपर्यंत शंभर टक्के खर्च झाला पाहिजे, शाळा- महाविद्यालयातील अठरा वर्षे पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना मतदार म्हणून नोंदणी करण्यासाठी विशेष मोहीम राबवावी

B1न्यूज मराठी नेटवर्क

सोलापूर : लोकशाहीच्या बळकटीकरणात नोकरशाहीचाही सहभाग मोठा व महत्त्वाचा असतो. त्यामुळे नोकरशाहीने निष्पक्ष व भयमुक्त वातावरणात निवडणुका पार पाडण्यासाठी अत्यंत तटस्थपणे आपली भूमिका पार पाडली पाहिजे, असे आवाहन राज्याचे प्रधान सचिव व मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित विशेष मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रम अंतर्गत आयोजित आढावा बैठकीत चोक्कलिंगम मार्गदर्शन करत होते. यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर, उप जिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निऱ्हाळी, स्वीप चे नोडल अधिकारी सुधीर ठोंबरे व सर्व उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी, तहसीलदार उपस्थित होते.

चोक्कलिंगम पुढे म्हणाले की, आगामी निवडणुका यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्वांनी अत्यंत जबाबदारीने काम करावे. विशेष मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रम अंतर्गत मतदार यादया अत्यंत बिनचूक होतील याची संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी व मतदार नोंदणी अधिकारी यांनी खात्री करावी. मतदार यादीतून नावांची वगळणी करत असताना निवडणूक आयोगाने निर्देशित केल्याप्रमाणे कार्यवाही करावी. स्थलांतरित होणाऱ्या मतदाराबाबत संबंधित जिल्ह्याच्या उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याशी समन्वय ठेवून नावे वगळणे अथवा मतदार यादीत ठेवण्याची कार्यवाही करावी, असेही त्यांनी सुचित केले.
जिल्ह्यातील 18 ते 19 वयोगटातील मतदारांची मतदार म्हणून नोंदणी करण्यासाठी शाळा महाविद्यालयात विशेष मोहीम राबवावी. या गटातील मतदारांची मोठ्या प्रमाणावर मतदार म्हणून नोंदणी होण्यासाठी प्रयत्न करावेत. प्रारूप मतदार या प्रत्येक राजकीय पक्षाला त्वरित पोहोच कराव्यात. तसेच या याद्या प्रत्येक मतदान केंद्रावर प्रसिद्ध होतील याची खात्री करावी. सर्व मतदारांनी मतदार यादीत आपले नाव आहे की नाही याची खात्री आत्ताच करणे आवश्यक आहे, ऐनवेळी मतदानाच्या दिवशी मतदान यादीत नाव नसल्याबाबतच्या तक्रारी येतात, त्या होऊ नयेत यासाठी संबंधित मतदारांनी व प्रशासनाने ही योग्य खबरदारी घ्यावी, असे आव्हान मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांनी केले.

आगामी विधानसभा निवडणूकच्या पार्श्वभूमीवर जि .पी. एस. ट्रॅकिंग सिस्टीम व वेब कास्टिंग ॲप हे राज्यस्तरावरून प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी चांगला अभ्यास करावा व तंत्रज्ञानाचा वापर निवडणूक कामकाज अधिक सुलभ व गतीने कशा पद्धतीने करता येईल यावर अधिक भर द्यावा, असे श्री. चोक्कलिंगम यांनी सांगून लोकसभा निवडणूक 2024 अनुषंगाने सोलापूर जिल्ह्याचा 57 कोटीचा खर्च झालेला असून राज्याकडून 22 कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आलेले होते. त्यापैकी फक्त 11 कोटीचा खर्च झालेला दिसून येत आहे. तरी 14 ऑगस्ट 2024 पर्यंत शंभर टक्के खर्च होण्याच्या दृष्टीने सर्व उपविभागीय अधिकारी यांनी प्रयत्न करावेत, असेही त्यांनी निर्देशित केले.

प्रारंभी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी 1 जुलै 2024 च्या अहर्ता दिनांकावर आधारित प्रारूप मतदार यादी दिनांक 6 ऑगस्ट 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या असून पाच राजकीय पक्षांनी सदरील याद्या घेऊन गेलेले असून उर्वरित पक्ष प्रतिनिधींना त्वरित याद्या पोहोच करण्यात येणार आहेत. दिनांक 6 ऑगस्ट रोजी जिल्ह्यात एकूण 36 लाख 92 हजार 409 इतके मतदार असून मतदान केंद्राच्या संख्येत 124 ने वाढ होऊन सध्या 3 हजार 723 इतकी मतदान केंद्रांची संख्या आहे. लोकसभा निवडणुकीनंतर 35 हजार 576 इतकी मतदार संख्या वाढलेली आहे. मतदार नोंदणी प्रलंबित अर्ज, वयानुसार मतदार संख्या, फॉर्म नंबर 6 ची सद्यस्थिती, होम टू होम सर्वे ची माहिती तसेच स्वीप कार्यक्रमाची सविस्तर माहिती त्यांनी यावेळी दिली.

चोक्कलिंगम यांची रामवाडी गोदामाला भेट व पाहणी :- मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांनी आज सकाळी रामवाडी येथील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ईव्हीएम मशीन ठेवलेल्या गोदामाला भेट देऊन ईव्हीएम मशीनची प्रथम स्तरीय तपासणीची पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निऱ्हाळी उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या