हेल्थ क्लबचा चौथा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा
महिलांसाठी ‘होम मिनिस्टर-खेळ पैठणीचा’ कार्यक्रम; सौ. राणी सचिन आजबे ठरल्या पैठणीच्या मानकरी
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : येथील फ्रेंड्स बहुउद्देशीय संस्था संचालित हेल्थ क्लबच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून (दि.३) चौथा वर्धापन दिन मात्रृमंदीर येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी हेल्थ क्लबच्या दिनदर्शिकेचे व आढावा पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून व दीप प्रज्वलनाने झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बार्शी ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षक डॉ. शितल बोपलकर तर प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक राहूल कुंकूलोळ, लायन्स क्लबचे अध्यक्ष अमित कटारिया, लायन्स क्लबच्या माजी महिलाध्यक्षा सौ. योगिता कटारिया, स्मार्ट अकॅडमीचे संचालक सचिन वायकुळे, सोजर डी फार्मसी विद्यालयाचे प्राचार्य सुजित करपे, बार्शी रनर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुधीर खाडे, उद्योजक सुजित जाधव, दै. पुढारीचे प्रतिनिधी गणेश गोडसे व हेल्थ क्लबचे अध्यक्ष चेतन चव्हाण व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी हेल्थ क्लबचे अध्यक्ष चेतन चव्हाण यांनी प्रस्तावनेतून हेल्थ क्लबच्या वतीने घेण्यात आलेले विविध शैक्षणिक व सामाजिक कार्यक्रमांविषयी माहिती दिली.
यावेळी बोलताना बार्शी रनर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुधीर खाडे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकत महीलांनी गुलामगिरीतून मुक्त व्हावे या उद्देशाने सावित्रीबाईंनी महिलांना शिकविले. परंतू महिला केवळ साक्षर झाल्या पण आजही अनेक महिला मानसिक गुलामगिरीत असून महिलांनी मानसिक गुलामगिरीतून मुक्त झाल्यावरच सावित्रीबाईंच्या कार्याचे खरे चीज होईल, असे मत व्यक्त केले.
स्मार्ट अकॅडमीचे संचालक सचिन वायकुळे यांनी मनोगत व्यक्त करताना, सावित्रीबाईंच्या कार्याची आठवण करुन देत जर आपल्या पाढीचा कणा ताठ आणि मनात स्वाभिमान व आत्मविश्वास असेल तरच आपण सावित्रीच्या लेकी होण्यास पात्र असेल असू, असे प्रतिपादन केले. तसेच यावेळी त्यांनी हेल्थ क्लबच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची प्रशंसा केली.
या कार्यक्रमात विविध क्षेत्रात बार्शीचे नावलकीक वाढविणाऱ्या खेळाडू, सामाजिक कार्यकर्ते यांचा सत्कारदेखील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाच्या दुपारच्या सत्रात महिलांसाठी ‘होम मिनिस्टर-खेळ पैठणीचा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहूल झोंबाडे यांनी केले. या खेळात 105 महिलांनी उत्फूर्तपणे सहभाग घेतला. यात सौ. राणी सचिन आजबे यांनी प्रथम क्रमांक पटकावित मानाची पैठणी जिंकली. तर द्वितीय पारितोषक चांदीचे पैंजण जिंकण्याचा मान सौ. प्रिया दिनेश गारमपल्ली यांना लाभला. तृतिय पारितोषक (सोन्याची नथ) सौ. बबिता विनायक नलावडे, चतुर्थ पारितोषक (चांदीचे जोडवे) सौ. कोमल अमोल चव्हाण तर पाचवे पारितोषक (चांदीचे बिचवे) सौ. रेष्मा सुधीर वाघमारे यांनी जिंकले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संभाजी नवले व भगवान लोकरे यांनी केले. तर आभार रवी कदम यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हेल्थ क्लबच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.