तरूणांना मोफत प्रशिक्षण व रोजगार मेळावे घेण्यासाठी जिल्हा नियोजनामधून निधी – पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील
छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिराचे’ आयोजन
B1न्यूज मराठी नेटवर्क
अहमदनगर : ‘जिल्ह्यातील तरूणांना आवश्यक व्यवसाय कौशल्य व प्रशिक्षण मोफत देण्याबरोबरच नियमित रोजगार मेळावे घेण्यासाठी जिल्हा नियोजन मधून निधी उपलब्ध करून दिला जाईल.” अशी ग्वाही राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दूग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आज येथे दिली.
कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या वतीने शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आयोजित ‘छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिराचे’ उद्घाटन महसूलमंत्री श्री.विखे पाटिल यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ, व्याख्याते गणेश शिंदे, श्रीकांत कलंत्री, प्रितमकुमार बेदरकर, नगरसेवक भय्या गंधे, सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य रोजगार केंद्र, निशांत सुर्यवंशी, जिल्हा व्यवसाय व शिक्षण प्रशिक्षण अधिकारी सुनिल शिंदे, वसंत राठोड, सुवेंद्र गांधी आदी मान्यवर उपस्थित होते.
महसूलमंत्री विखे-पाटील म्हणाले की, “काळानुरूप बदलणा-या संधी स्वीकारण्यास तरूणांनी तयार असले पाहिजे. विविध क्षेत्रातील नवनवीन संधी तरूणांनी घेतल्या पाहिजेत . नोकरीच्या मागे न धावता व्यवसाय कौशल्य शिकून रोजगारक्षम होण्याचा प्रयत्न करावा. अधिकाधिक रोजगार संधी उपलब्ध करून देणारे महाराष्ट्र एकमेव राज्य आहे.” “शासकीय कौशल्य, उद्योग प्रशिक्षण संस्था, आरटीआय यांनी काळानुरूप आपल्या प्रशिक्षण कार्यक्रमात बदल करून कृत्रिम बुद्धिमत्ता, ॲनिमेशन, रेडिओ जॉकी, क्लाऊड कॉम्प्युटिंग यासारखे भविष्य असलेले नवनवीन अभ्यासक्रम सुरू करावेत.”अशी अपेक्षाही श्री. विखे-पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.
महसूलमंत्री विखे-पाटील म्हणाले, “लार्सन अँड टुब्रो, महिंद्रा यांसारख्या कंपन्या आपल्या जिल्ह्यात त्यांचे उद्योग सुरू करण्यास उत्सुक आहेत. यासाठी तरूणांनी नवनवीन कौशल्य आत्मसात करावीत.” यावेळी व्याख्याते गणेश शिंदे यांनी अनेक उदाहरणे देत तरूणांना उद्बोधनपर शब्दात मार्गदर्शन केले.
या शिबिरात ‘दहावी, बारावीनंतर विद्यार्थ्यांना करिअरच्या संधी’ या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. शिबिरात ‘करिअर विषयक’ माहिती देणाऱ्या प्रदर्शन भरविण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक जिल्हा व्यवसाय व प्रशिक्षण अधिकारी एस.डी.शिंदे यांनी केले. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य खलील जहागिरदार यांनी आभार मानले. सूत्रसंचालन उद्धव काळापहाड यांनी केले.