राहुल गांधींची खासदारकी सुडभावनेतून रद्द करण्यात आली ; पृथ्वीराज चव्हाणांचे मोदी सरकारवर आरोप
B1न्यूज मराठी नेटवर्क
मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी ‘मोदी’ आडनावावरून केलेल्या टिप्पणीवरून सुरत न्यायालयाने त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली. यातच आता राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. लोकसभा सचिवालयाने हा निर्णय घेतला आहे. यानंतर काँग्रेस नेत्यांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी राहुल गांधींच्या वाढत्या लोकप्रियतेला घाबरलेले आहेत. हे सुडाचं राजकारण आहे. काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधींना ‘भारत जोडो’ यात्रेमुळे लोकप्रियता मिळाली आहे. पण, राहुल गांधींचा संसदेतील आवाज बंद करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे,अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.
एकाबाजूला शिक्षा करून दोन वर्ष तुरूंगात डांबायचं, दुसरीकडे त्यांची खासदारकी रद्द करून आवाज बंद करण्याचा हा प्रयत्न आहे. ही पूर्णपणे सुडभावनेतून करण्यात आलेली कारवाई आहे. राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्याचा प्रयत्न अनेक दिवसांपासून चालू आहे. कटकारस्थान रचून हे करण्यात आले असल्याचे चव्हाण म्हणाले. दरम्यान महागाई , बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात नरेंद्र मोदी अपयशी होत आहेत. त्यामुळे त्यांच्या लोकप्रियतेत घट होत आहे, असा घाणघातही चव्हाण यांनी केला.