काँग्रेसला मोठा धक्का ; दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर राहुल गांधींची खासदारकी रद्द

B1न्यूज मराठी नेटवर्क
नवी दिल्ली : मागील लोकसभा निवडणुकीदरम्यान सर्व चोरांचे आडनाव मोदी कसे? असा प्रश्न उपस्थित करत काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला. याप्रकरणी काल सुरत न्यायालयाने राहुल गांधी यांना दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्यानंतर आता राहुल गांधी यांचं संसद सदस्यत्व रद्द झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना खासदार म्हणून अपात्र ठरवण्यात आले आहे.
केरळच्या वायनाड मतदारसंघातून राहुल गांधी खासदार म्हणून निवडून आले होते. राहुल गांधी यांना ‘मोदी आडनाव’ बद्दल टिपण्णी केल्यानंतर त्यांना दोषी ठरवून लोकसभा सदस्य म्हणून अपात्र ठरवण्यात आले आहे.
सुरत न्यायालयाने मानहानीच्या एका प्रकरणात राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा सुनावली. यानंतर काँग्रेससह सर्व विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडले. या प्रकरणी राहुल गांधी यांना उच्च न्यायालयात अपील करता यावी म्हणून त्यांना न्यायालयाने ३० दिवसांचा वेळ दिला असला तरी शिक्षेला स्थगिती दिलेली नाही. विशेष म्हणजे न्यायालयाने त्यांना जामीनही मंजूर केला.