सोलापूरच्या रंगभूमीवर रंगणार नाट्यकलेचा महोत्सव : २७ नोव्हेंबरपासून ६५ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा!

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : मराठी रंगभूमीची समृद्ध परंपरा जपण्याबरोबरच नवोदित नाट्यकलावंतांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणारी ६५ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा सोलापूर येथे २७ नोव्हेंबर २०२६ पासून सुरू होत आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आयोजित या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे आयोजन सोलापूरसह राज्यातील विविध २४ जिल्हास्तरीय केंद्रांवर करण्यात आले आहे.
सोलापूर केंद्रावरील स्पर्धेचे उद्घाटन शुक्रवार, दि. २७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता हुतात्मा स्मृती मंदिर, सोलापूर येथे होणार आहे. यानिमित्ताने सोलापूरकर नाट्यरसिकांना सलग अनेक दिवस विविध विषयांवरील दर्जेदार नाट्यप्रयोगांचा आनंद घेण्याची संधी मिळणार आहे.
मराठी रंगभूमीला नवी ऊर्जा देणे, नाट्यकलेचा विकास करणे तसेच नवोदित कलाकार, लेखक, दिग्दर्शक आणि तंत्रज्ञांना आपली कलात्मक गुणवत्ता सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे. यंदा स्पर्धेचे ६५ वे वर्ष असून, विविध नाट्यसंस्थांकडून सामाजिक, सांस्कृतिक आणि समकालीन विषयांवर आधारित नाटके सादर केली जाणार आहेत.
सोलापूर केंद्रावरील नाटकांचे वेळापत्रक
२७ नोव्हेंबर – खूनी खंजीर
२८ नोव्हेंबर – देव देतो दोन
२९ नोव्हेंबर – एक नार गाव बाजार
३० नोव्हेंबर – इश्क का परचा
१ डिसेंबर – भिंतीवरचा बंगला
२ डिसेंबर – पालवी द माइलस्टोन
३ डिसेंबर – भोवरा
४ डिसेंबर – शेवंता जिती हाय
५ डिसेंबर – स्पर्शाची पाल
७ डिसेंबर – मत्स्यगंधा
८ डिसेंबर – बझर
९ डिसेंबर – आय विल कॉल यू लेटर!
१० डिसेंबर – अय
११ डिसेंबर – अंधायुग
१३ डिसेंबर – DNA
१४ डिसेंबर – ओॲसिस
१५ डिसेंबर – सृजन-मयसभा
स्पर्धेतील सर्व नाट्यप्रयोग सायंकाळी ७ वाजता हुतात्मा स्मृती मंदिर, सोलापूर येथे सादर होणार आहेत. या स्पर्धेमुळे स्थानिक नाट्यप्रेमींना विविध नाट्यप्रकार, वेगवेगळे विषय आणि नव्या कलावंतांच्या अभिनयकौशल्याचा अनुभव घेता येणार आहे. मराठी नाट्यपरंपरेचा वारसा पुढे नेण्यासाठी अशा स्पर्धा महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतात. नवोदित कलाकारांना प्रोत्साहन देण्याबरोबरच सोलापूरच्या सांस्कृतिक क्षेत्रातही या स्पर्धेमुळे उत्साहाचे वातावरण निर्माण होणार आहे.
सोलापूरकर नाट्यरसिकांनी या नाट्यस्पर्धेतील प्रयोगांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून नवोदित कलाकारांचा उत्साह वाढवावा आणि मराठी रंगभूमीच्या या सांस्कृतिक सोहळ्याचा आनंद घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने करण्यात आले आहे.




