बार्शीत अनैतिक देहव्यापाराच्या अड्ड्यावर पोलिसांचा छापा; पाच पीडित महिलांची सुटका!

तेलगिरणी चौकातील वाड्यात सुरू होता अनैतिक मानवी व्यापार; चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल, १२ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : शहरातील तेलगिरणी चौक परिसरात सुरू असलेल्या अनैतिक देहव्यापाराच्या अड्ड्यावर बार्शी शहर पोलिसांनी छापा टाकत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पाच पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून, कुंटणखाना चालविणाऱ्या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून रोख रक्कम व मोबाईल फोन असा एकूण १२ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
दिनांक २४ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी तेलगिरणी चौक परिसरात महिलांचा अनैतिक मानवी व्यापार सुरू असल्याची माहिती बार्शी शहर पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी संबंधित ठिकाणी विशेष कारवाई केली.
यावेळी एका वाड्यामध्ये महिलांना चांगले काम मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांना त्यांच्या इच्छेविरुद्ध ताब्यात ठेवले जात असल्याचे आणि त्यांच्याकडून अनैतिक देहव्यापार करून घेतला जात असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले. या प्रकरणी किरण सागर परांजपे (वय ३३, मूळ रा. इचलकरंजी, जि. कोल्हापूर, सध्या रा. तेलगिरणी चौक, बार्शी), मनिषा जाधव (लातूरकर दीदी), सुग्रीव उर्फ सुजित उर्फ आबा बोकेफोडे आणि सविता शेलार (रा. बार्शी, जि. सोलापूर) अशा चार जणांविरुद्ध बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ९३०/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेतील कलम १४३ (२), १४४ (२), ३ (५) तसेच अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायदा १९५६ मधील कलम ३, ४ व ५ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या कारवाईमुळे बार्शी शहरातील अनैतिक मानवी व्यापाराच्या प्रकारांवर पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईची चर्चा सुरू झाली आहे. पीडित महिलांची सुटका झाल्याने या कारवाईला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.




