खिंडसी तलाव परिसरातील सात गावांच्या क्षेत्रात 1 हजार एकरवर चारा लागवड चारा टंचाई निवारणासाठी प्रशासनाच्या उपाययोजना मका, सुपर नेपीयर आणि बाजरी लागवडीचे नियोजनजिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची मान्यता

B1न्यूज मराठी नेटवर्क
नागपूर : संभाव्य चारा टंचाईवर मात करण्यासाठी रामटेक तालुक्यातील खिंडसी तलाव परिसरातील सात गावांच्या हद्दीतील गाळपेर जमिनीवर चारा लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे. या सातही गावांमध्ये प्रत्येकी 150 एकर याप्रमाणे एकूण 1 हजार 50 एकर क्षेत्रावर चारा लागवड करण्यात येणार आहे. या नियोजनाला जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी मान्यता दिली आहे.
गाळपेर क्षेत्रातील चारा लागवडीच्या नियोजनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खांडे, रामटेकचे उपविभागीय अधिकारी प्रियेश महाजन, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. अर्चना कडू, पशुसंवर्धन विभागाचे बळी, गटविकास अधिकारी तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
जमिनीतील पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन पिकांची निवड करण्यात आली आहे. पाण्याचे स्रोत उपलब्ध असलेल्या जमिनीवर मका, मध्यम स्वरूपाचा पाणीसाठा असलेल्या जमिनीवर सुपर नेपीयर, तर कमी पाणी उपलब्ध असलेल्या जमिनीवर बाजरीची लागवड करण्यात येणार आहे. याशिवाय उर्वरित जमिनीवर गोशाळा आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांना चारा लागवडीसाठी परवानगी देण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
चारा लागवडीच्या नियोजनासाठी रामटेक तालुकास्तरीय गाळपेर समिती गठीत करण्यात आली आहे. तहसीलदार हे समितीचे अध्यक्ष, तर तालुका पशुसंवर्धन अधिकारी सदस्य सचिव असतील. गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी तसेच पाटबंधारे व लघुपाटबंधारे विभागाचे अभियंते समितीचे सदस्य राहणार आहेत. रामटेकच्या धर्तीवर जिल्ह्यातील अन्य तालुक्यांमध्येही तालुकास्तरीय समित्या स्थापन करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितले.
व्हीबी-जी राम जी योजनेंतर्गत चारा लागवड
व्हीबी-जी राम जी योजनेंतर्गत गाळपेर क्षेत्रात मका, बाजरी आणि सुपर नेपीयरची लागवड गाळपेर समितीच्या मान्यतेनंतर करण्यात येणार आहे. जिल्ह्यात आतापर्यंत तीन कोटी रुपयांचे ७७ हजार ५०० किलो बियाणे वितरित करण्यात आले आहे. बियाण्यांचा पुरेसा साठा उपलब्ध असून, ज्या शेतकरी किंवा संस्थांना बियाणे आवश्यक आहे त्यांनी प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.
लागवड केलेल्या चारा पिकांची छायाचित्रे सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. या मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने काम करावे, असे निर्देश त्यांनी दिले. तसेच नगरपरिषद क्षेत्रातील गायरान आणि गाळपेर जमिनीवरही चारा लागवडीचे नियोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.




