बालविवाहाला नकार द्या, अन्यायाविरुद्ध आवाज उठवा न्यायाधीश अमोलकुमार देशपांडे यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

धोत्री येथील श्री भगवती गौरीमाता प्रशालेत सुरक्षित बचपन अभियानांतर्गत कायदेविषयक मार्गदर्शन
B1न्यूज मराठी नेटवर्क
सोलापूर दि. 26 : बालविवाह ही बालकांच्या भविष्यावर घाला घालणारी सामाजिक समस्या असून, बालवयातच मुला-मुलींना त्यांच्या हक्कांची आणि संरक्षणासाठी असलेल्या कायद्यांची जाणीव होणे आवश्यक आहे, तसेच सुरक्षित आणि असुरक्षित स्पर्शातील फरक ओळखून अन्यायाविरुद्ध निर्भयपणे आवाज उठवा, असे आवाहन वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव अमोलकुमार देशपांडे यांनी केले.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री येथील श्री भगवती गौरीमाता प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूर यांच्या वतीने सुरक्षित बचपन अभियानांतर्गत आयोजित कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी न्यायाधीश अमोलकुमार देशपांडे यांनी बालविवाह प्रतिबंधक अधिनियमाची माहिती देत बालविवाहाचे दुष्परिणाम स्पष्ट केले. सुरक्षित स्पर्श आणि असुरक्षित स्पर्श यांतील फरक समजावून सांगताना आई-वडिलांचा मायेचा स्पर्श, आजी-आजोबांची प्रेमाची थाप, डॉक्टरांकडून उपचारादरम्यान होणारा आवश्यक स्पर्श आणि कौतुकाची शाबासकीची थाप ही सुरक्षित स्पर्शाची उदाहरणे दिली. मात्र, कोणत्याही व्यक्तीच्या गैरवर्तनाची जाणीव झाल्यास त्याला वेळीच विरोध करा, प्रसंग ओळखून ठाम निर्णय घ्या आणि अशा घटना त्वरित आई-वडील किंवा शिक्षकांना सांगा, असे मार्गदर्शन त्यांनी केले.
मुख्याध्यापक गिरीमल बुगडे यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण च्या सुरक्षित बचपन अभियानाचे कौतुक करत ग्रामीण भागातील मुलांना या मुळे असुरक्षित स्पर्श विषयी जागरूकता निर्माण होण्यास मदत होईल असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक गिरमल बुगडे होते. यावेळी पर्यवेक्षक परमेश्वर मेरू, भानुदास राठोड, मल्लिकार्जुन गुरव, मल्लिनाथ कोरे, शोभाराणी कुंभार आदी उपस्थित होते. अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूर. यांनी दिली आहे.




