४२ वर्षांच्या वैराला अखेर पूर्णविराम; सपोनि अक्षय सोनवणे यांच्या मध्यस्थीने दोन परिवारांमध्ये सलोखा

0

तीन पिढ्यांचा संघर्ष संपला; पोलिसांसमोर कट्टर विरोधकांनी घेतली गळाभेट

B1 न्यूज मराठी नेटवर्क5000

बार्शी : तालुक्यातील कव्हे गावात तब्बल ४२ वर्षांपासून सुरू असलेल्या दोन परिवारांतील जुन्या वैराला अखेर पूर्णविराम मिळाला. बार्शी तालुका पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या पुढाकाराने आणि प्रभावी मध्यस्थीमुळे दोन्ही गटांमध्ये सलोखा निर्माण झाला. वर्षानुवर्षे न्यायालयीन लढाई लढणारे कट्टर विरोधक पोलिसांसमोरच गळाभेट घेत भावनिक झाले.

सागर हजारे आणि सत्यवान हजारे यांच्या परिवारामधील हा वाद तीन पिढ्यांपासून सुरू होता. या संघर्षातून दोन्ही बाजूंविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले होते. कलम ३०७ सारख्या गंभीर गुन्ह्यांपर्यंत हा वाद पोहोचला होता. सततच्या न्यायालयीन चकरा, आर्थिक व मानसिक त्रास आणि समाजात निर्माण झालेला तणाव यामुळे दोन्ही परिवार त्रस्त झाले होते.

पोलिसांनी साधला संवादाचा पूल

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सपोनि अक्षय सोनवणे यांनी दोन्ही परिवारांशी स्वतंत्र संवाद साधला. कायदेशीर परिणाम, भविष्यातील अडचणी आणि या वैरामुळे दोन्ही कुटुंबांचे झालेले नुकसान समजावून सांगत त्यांनी शांततेचा मार्ग स्वीकारण्याचे आवाहन केले.500या मध्यस्थीत पोलीस उपनिरीक्षक सदाशिव गवळी, अमित घाडगे, गावचे उपसरपंच वैभव शिंदे, माजी सरपंच बाबासाहेब पाटील, डॉ. बुरगुटे तसेच गावातील सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनीही महत्त्वाची भूमिका बजावली.

अश्रूंनी संपला तीन पिढ्यांचा संघर्ष

वर्षानुवर्षे एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले दोन्ही परिवार अखेर पोलिसांसमोर समोरासमोर आले. जुन्या कटु आठवणी बाजूला ठेवत त्यांनी एकमेकांना गळाभेट घेतली. हा क्षण उपस्थितांसाठी अत्यंत भावनिक ठरला. अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले आणि तीन पिढ्यांच्या वैराचा अध्याय शांततेत संपला.

सामाजिक सलोख्याचा आदर्श

या मध्यस्थीमुळे दोन्ही परिवारांनी भविष्यात शांततेने, सलोख्याने आणि बंधुभावाने राहण्याची सहमती दर्शवली. या घटनेतून पोलीस केवळ कायदा अंमलबजावणी करणारी यंत्रणा नसून समाजात संवाद घडवून आणणारे, वाद मिटवणारे आणि सामाजिक सलोखा निर्माण करणारे घटक असल्याची सकारात्मक प्रतिमा अधिक अधोरेखित झाली.500

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या