स्वतःची कल्पना, स्वतःची निर्मिती अन् थेट बाजारपेठेत विक्री! बी. पी. सुलाखे कॉमर्स कॉलेजच्या विद्यार्थिनींची उद्योजकतेकडे दमदार वाटचाल; सणासुदीच्या वस्तूंना ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर संलग्नित श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित बी. पी. सुलाखे कॉमर्स कॉलेज, बार्शी येथील वाणिज्य विभागाच्या विद्यार्थिनींनी Institution’s Innovation Council (IIC) च्या मार्गदर्शनातून शिक्षणासोबतच उद्योजकतेची कास धरत एक प्रेरणादायी पाऊल टाकले आहे.

महाविद्यालयीन मार्गदर्शन आणि स्वतःच्या स्वयंप्रेरणेतून विद्यार्थिनींनी आपल्या परिसरातील स्थानिक गरजा, ग्राहकांची आवड आणि सणासुदीच्या काळातील आवश्यक वस्तूंची मागणी यांचा अभ्यास केला. त्यानुसार त्यांनी स्वतःच्या कल्पनेतून घरच्या घरी विविध आकर्षक, टिकाऊ व वॉशेबल हस्तकला वस्तू तयार केल्या आणि त्यांची प्रत्यक्ष विक्रीही सुरू केली आहे.

विद्यार्थिनींनी लोकरीची तोरणे, थालपोष, चौरंगासाठी मॅट रांगोळी, डोअर मॅट रांगोळी, समई आसन, गणपती बाप्पासाठी आकर्षक हार अशा विविध वस्तू तयार केल्या आहेत. विशेष म्हणजे ग्राहकांच्या आवडीनुसार व मागणीनुसार कस्टमाइज्ड वस्तू तयार करून देण्यावर विद्यार्थिनींचा भर आहे. या वस्तूंना ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून, विद्यार्थिनींकडे विविध वस्तूंच्या ऑर्डर्सही प्राप्त होत आहेत.

गणेशोत्सवानंतर दसरा, दिवाळी आणि मार्गशीर्ष महिन्यातील सण-समारंभांसाठी आवश्यक वस्तू तयार करण्याचे नियोजन विद्यार्थिनींनी केले असून, मागणीनुसार उत्पादन व विक्रीचा हा उपक्रम पुढेही सुरू ठेवण्याचा त्यांचा मानस आहे.500

“शिकत असतानाच बाजारपेठ समजून घेणे, ग्राहकांची गरज ओळखणे, त्यानुसार उत्पादन तयार करणे आणि त्याची विक्री करणे, ही उद्योजकतेची खरी सुरुवात आहे,” या विचाराचे प्रत्यक्ष उदाहरण विद्यार्थिनींनी आपल्या कृतीतून दिले आहे. Startup India सारख्या उपक्रमांच्या माध्यमातून युवकांनी नोकरीच्या शोधात राहण्याऐवजी स्वतःचा व्यवसाय उभारून रोजगारनिर्माते व्हावे, या व्यापक उद्दिष्टाच्या दिशेने विद्यार्थिनींचे हे पाऊल महत्त्वपूर्ण मानले जात आहे.

या उपक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. बी. कदम, Institution’s Innovation Council चे समन्वयक डॉ. एम. ए. ढगे, ग्रंथपाल प्रा. ज्योती यादव आणि वाणिज्य विभागप्रमुख के. बी. चपटे यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन व प्रोत्साहन दिले. स्थानिक गरजांमधून व्यवसायाच्या संधी शोधाव्यात, नावीन्यपूर्ण उत्पादनांची निर्मिती करावी आणि त्यातून स्वतःचा उद्योग उभा करण्याच्या दिशेने वाटचाल करावी, असे मार्गदर्शन प्राचार्य डॉ. ए. बी. कदम यांनी केले. तसेच विद्यार्थिनींनी आत्मसात केलेले कौशल्य पुढील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यशाळा आयोजित करून प्रशिक्षण द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.

या उपक्रमामध्ये शिवानी तानाजी पवार, प्राची भास्कर मस्तुद, मानसी किरण ढाळे आणि वैष्णवी पांडुरंग जाधव या विद्यार्थिनींनी पुढाकार घेतला आहे.

विद्यार्थिनींच्या या उपक्रमातून केवळ हस्तकलेचे प्रदर्शन होत नसून, महिला सक्षमीकरण, कौशल्यविकास आणि आर्थिक स्वावलंबनाचा संदेशही दिला जात आहे. “आपल्या हातातील कौशल्याला बाजारपेठ मिळू शकते आणि कल्पनेचे रूपांतर उद्योगात करता येते,” हा आत्मविश्वास निर्माण करणारी ही सुरुवात भविष्यात अनेक विद्यार्थिनींना स्वतःचा उद्योग उभारण्यासाठी प्रेरणा देणारी ठरणार आहे.500

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या