बार्शीत श्रावण मास प्रवचनमालेस प्रारंभ, श्रीमद् भागवतात मानवाच्या जीवनाचा उद्धार करण्याचे सामर्थ्य आहे — डाॅ. जयवंत बोधले महाराज
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : श्रीमद् भागवत म्हणजे मानवाला मृत्यूच्या भयापासून निवृत्त करून आत्मबोध आणि आत्मसाक्षात्कार घडविणारा ग्रंथराज आहे, असे निरूपण ह. भ. प. जयवंत बोधले महाराज यांनी केले. बार्शी येथील श्री भगवंत मंदिरात श्रावण मासानिमित्त गेल्या बावीस वर्षांची परंपरा लाभलेल्या प्रवचनमालेस प्रारंभ झाला. यावेळी ‘श्रीमद् भागवत’ या विषयावर प्रवचन करताना बोधले महाराज बोलत होते. प्रवचनमालेच्या प्रारंभास मंदिरात हजारो भाविकांची उपस्थिती होती.
यावेळी ह. भ. प. जयवंत बोधले महाराज म्हणाले, “जगावे कसे हे भगवद्गीता सांगते, तर जगण्याचे सार्थक कसे करावे हे श्रीमद् भागवत सांगते.” श्रीमद् भागवत हा बारा स्कंध आणि १८ हजार श्लोकांमध्ये विस्तारलेला अध्यात्माचा दीप आहे. श्रीमद् भागवत म्हणजे श्रीकृष्णाचे जीवनदर्शन आहे. तसेच राजा परीक्षिताला मृत्यूच्या भयापासून निवृत्त होण्यासाठी शुकमुनींनी केलेला हितोपदेश म्हणजे श्रीमद् भागवत होय.
श्रीकृष्ण परमात्मा निजधामाला गेले, तसेच पुंडलिकाच्या भक्तीने कटेवर हात ठेवून पंढरपुरात विठ्ठल रूपात अवतीर्ण झाले आणि श्रीमद् भागवताच्या रूपाने ते ग्रंथरूपात साकार झाले, असेही त्यांनी सांगितले.
श्रीमद् भागवतामध्ये सृष्टीच्या रचनेपासून जीवनातील विविध विषयांवर सखोल विचार करण्यात आला आहे. त्यामुळे श्रीमद् भागवताचे श्रवण हे गुरुवर श्रद्धा ठेवून आणि पूर्णपणे मन स्थिर ठेवून केले पाहिजे. श्रीमद् भागवतात मानवाच्या जीवनाचा उद्धार करण्याचे सामर्थ्य आहे, असे बोधले महाराज यांनी सांगितले. यावेळी प्रा. विलास जगदाळे यांनी प्रास्ताविक केले, तर दादा बुडुख यांनी श्रीमद् भागवत ग्रंथाचे पूजन केले. श्रावण मासाच्या या प्रवचनमालेस प्रारंभापासूनच भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.




