पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा गुरुवारी 22 वा दीक्षांत समारंभ
B1न्यूज मराठी नेटवर्क
सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा शैक्षणिक वर्ष 2025-26 चा 22 वा दीक्षांत समारंभ गुरुवार, दि. 30 जुलै 2026 रोजी सकाळी अकरा वाजता विद्यापीठाच्या दीक्षांत प्रांगणात होणार असून यावेळी एकूण 11 हजार 851 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांनी पत्रकार परिषदेत दिली. याचबरोबर 162 संशोधक विद्यार्थ्यांना पीएच. डी पदवी तर 57 विद्यार्थ्यांना सुवर्णपदके देऊन सन्मानित करण्यात येणार आहेत. महाराष्ट्रात प्रथमच एप्रिल – मे, २०२६ चा निकाल मुदतीत जाहीर करून त्याचे पदवीदान समारंभ निकालानंतर केवळ १ महिन्यात आयोजित करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
जिष्णु देव वर्मा, महामहिम राज्यपाल तथा कुलपती, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर हे दीक्षांत समारंभाचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. चंद्रकांत (दादा) पाटील, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्य हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. डॉ. विनय सहस्त्रबुध्दे, खासदार (राज्यसभा) हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहून दीक्षांत भाषण करतील. याप्रसंगी पद्मभूषण प्रा. डॉ. जेष्ठराज भालचंद्र जोशी यांना डी. एस्सी. तर पद्मश्री गिरीश यशवंत प्रभुणे यांना डी. लिट. ही सन्मान्य पदवी देवून सन्मानित करण्यात येणार आहे. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पदवी प्रदान होणार आहे.
गुरुवारी सकाळी साडेदहा वाजता प्रशासकीय इमारतीपासून ते दीक्षांत मंडपापर्यंत दीक्षांत मिरवणूक निघणार आहे. परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. श्रीकांत अंधारे हे ज्ञानदंड हाती घेऊन मिरवणुकीच्या अग्रभागी असणार आहेत. त्यानंतर प्रत्यक्ष कार्यक्रमाला सुरुवात होईल. या समारंभात विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा, मानवविज्ञान विद्याशाखा व आंतर-विद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेच्या विद्यार्थ्यांना पदवी देऊन सन्मानित करण्यात येईल.
यावर्षी 162 विद्यार्थ्यांना पीएच. डी पदवी प्रदान केली जाणार आहे. त्याचबरोबर यंदा 57 विद्यार्थी सुवर्णपदकाचे मानकरी ठरले आहेत. विविध विषयात गुणानुक्रमे प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना देणगीदारांनी दिलेल्या रकमेतून सुवर्णपदक देऊन त्यांचा यथोचित सन्मान केला जातो. अशा एकूण 59 विद्यार्थ्यांना सुवर्णपदक देऊन सन्मानित केले जाणार आहे. दीक्षांत समारंभाचा कार्यक्रम झाल्यानंतर महाविद्यालयांना पदवी प्रमाणपत्र वाटप केले जाणार आहे. यासाठी विद्यापीठ परीक्षा विभागाने खास सोय केलेली आहे. सुवर्णपदके पटकावणाऱ्यांमध्ये मुलींची संख्या अधिक आहे.
या पत्रकार परिषदेस प्र-कुलगुरु प्रा.लक्ष्मीकांत दामा, प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. श्रीकांत अंधारे, वित्त व लेखाधिकारी सीए. महादेव खराडे, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा प्रभारी अधिष्ठाता डॉ. प्रशांत पवार, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा प्रभारी अधिष्ठाता, डॉ. शिवाजी शिंदे, मानवविज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. महेश खरात, आंतर-विद्याशाखीय अभ्यास विद्याशाखा प्रभारी अधिष्ठाता डॉ. राजशेखर हिरेमठ, प्रसिध्दी समिती समन्वयक डॉ. मलिक रोकडे यांच्यासह विद्यापीठातील उपकुलसचिव, सहायक कुलसचिव आणि इतर अधिकारी उपस्थित होते.





