पीकस्पर्धा २०२६ : शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी;राज्यस्तरावर ₹५० हजारांपर्यंत बक्षीस

0

B1न्यूज मराठी नेटवर्क500

छत्रपती संभाजीनगर, दि. २८ : राज्यातील शेतकऱ्यांच्या उत्पादनक्षमतेला प्रोत्साहन देण्यासाठी कृषी विभागाने खरीप हंगाम २०२६ मधील अन्नधान्य, कडधान्य आणि गळीतधान्य पिकांच्या पीकस्पर्धेसाठी ऑनलाइन अर्ज मागविले आहेत. यंदापासून अर्ज प्रक्रिया स्वतंत्र ऑनलाइन पोर्टलद्वारे राबविण्यात येत असून, अधिकाधिक शेतकऱ्यांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक श्री. सुनील वानखेडे यांनी केले आहे.

यावर्षीच्या स्पर्धेत भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग आणि सूर्यफूल या ११ खरीप पिकांचा समावेश करण्यात आला आहे. स्पर्धा तालुका, जिल्हा आणि राज्य अशा तीन स्तरांवर होणार असून, सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी स्वतंत्रपणे विजेत्यांची निवड करण्यात येणार आहे.500स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत. तालुका स्तरावर प्रथम ₹५,०००, द्वितीय ₹३,००० आणि तृतीय ₹२,०००, जिल्हा स्तरावर प्रथम ₹१०,०००, द्वितीय ₹७,००० आणि तृतीय ₹५,०००, तर राज्य स्तरावर प्रथम ₹५०,०००, द्वितीय ₹४०,००० आणि तृतीय ₹३०,००० इतकी बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत.

मूग व उडीद पिकांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ जुलै २०२६, तर भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, तूर, सोयाबीन, भुईमूग आणि सूर्यफूल या पिकांसाठी ३१ ऑगस्ट २०२६ ही अंतिम तारीख आहे.

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अर्जदाराच्या नावावर जमीन असणे, ती स्वतःच्या ताब्यात व लागवडीखाली असणे आणि आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाइन अर्ज करणे बंधनकारक आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या ‘पीक स्पर्धा नोंदणी’ पोर्टलवरून अर्ज करावा. अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.500

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या